
वाखारी (ता. नांदगाव) —
एकात्म मानवतावाद ही संकल्पना माणसाच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी असून माणूस हा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही स्तरांचा समतोल विकास साधतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने एकात्म मानवतावाद साकारतो, असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले.
नांदगाव महाविद्यालयाच्या वतीने वाखारी येथे आयोजित हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात ‘एकात्म मानवतावाद’ या विषयावर ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ही संकल्पना प्रथम पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली असून ती केवळ पुस्तकात वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात अनुभवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरातून घडणारा स्वयंसेवक संवेदनशील, जबाबदार व सेवाभावी वृत्तीने समाजात कार्यरत राहिला, तर समाजविकासाला निश्चितच चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सेवा हीच साधना, समाज हाच देव आणि माणूस हाच केंद्रबिंदू मानून कार्य करा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
“मी जिथे जाईन तिथे समरसता नेईन आणि मी जे करीन ते समाजहितासाठी करीन,” असा संकल्प शिबिरार्थींना यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिबिरप्रमुख प्रा. अहिरे यांनी प्रा. सुरेश नारायणे यांचे स्वागत केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. ए. मराठे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक व मान्यवरांनी शिबिराला भेट दिली.
दुसऱ्या बौद्धिक सत्रात महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. एम. बी. अटोळे यांनी स्वयंसेवकांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्याध्यापक प्रशांत जयसिंग आहिरे, रा.से.यो. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. डी. ठाकरे, प्राध्यापकवृंद, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.
