
लासलगाव, ता.१७ ( प्रतिनिधी) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाले अंतर्गत ‘हास्ययोग’ या विषयावर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ.सुषमा दुगड यांनी गुंफले. आपल्या व्याख्यानात डॉ. दुगड यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी हास्ययोगाचे महत्त्व विशद करताना नियमित हास्यामुळे मानसिक तणाव कमी होतो, सकारात्मकता वाढते तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, “हास्य हेच सर्वोत्तम औषध आहे” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात हास्याचे महत्त्व विशद करताना, तणावमुक्त जीवनासाठी विद्यार्थ्यांनी आनंदी व सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सृष्टी थोरात यांनी केले. तर प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.राजेश शंभरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.राजेश शंभरकर यांनी परीश्रम घेतले. यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास डॉ. बाजीराव आहिरे, प्रा.उषा आहिरे, प्रा.शाहरूख मणियार, प्रा.संदीप ठाकरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
