
नांदगाव (प्रतिनिधी )कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या वतीने 12 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत ‘राष्ट्रीय युवक सप्ताह’ साजरा केला जात आहे. त्या अतंर्गत ‘भारताच्या विकासात युवकांचे स्थान’ या विषयावर सेवानिवृत्त प्राध्यापक राजेंद्र नंद यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे यांनी प्राध्यापक नंद यांचे स्वागत केले.

आपल्या व्याख्यानातून प्रा.राजेंद्र नंद यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या आर्थिक, सामाजिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, शैक्षणिक इ.क्षेत्रातील विकासात महापुरुष व मान्यवरांनी दिलेल्या योगदानाची विविध उदाहरणे देऊन सविस्तर माहिती दिली. जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त असल्याने युवकांनी आपल्या ऊर्जा शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करून समाजकार्यात व राष्ट्रनिर्माण कार्यात आपले उत्कृष्ट योगदान देता यावे यासाठी स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्राचा व कार्याचा आदर्श घेण्याचे याप्रसंगी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
आपल्या देशाला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी नेण्याचे कार्य आजचा युवकच करू शकतो म्हणून भविष्यात आपल्याला ज्या क्षेत्रात कार्य करण्याची सुवर्णसंधी मिळेल त्यातून समाजाचा पर्यायाने राष्ट्राचा विकास साधेल असे कार्य करण्याचे आवाहन केले व त्यासाठी आजच्या तरुणाईला व्यसनांपासून दूर राहण्याचा व मोबाईलचा वापर कमी करण्याचा मौलिक सल्ला दिला.
सकारात्मक जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी योग, प्राणायाम,मेडिटेशन व ध्यानधारणा करावी यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.एम.राठोड, कला व वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा.जी.व्ही. बोरसे, प्रा.महाले, प्रा.एस.जी. पवार, प्रा.एस.सी.पैठणकर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.एस.जी.पवार यांनी केले.
