
लासलगाव, ता.१७ (प्रतिनिधी ) योग्य आहार, नियमित दिनचर्या, सकारात्मक विचारसरणी व निसर्गाशी सुसंवाद ठेवल्यास निरोगी जीवन आयुष्य जगता येते. दैनंदिन जीवनातील अशा लहान-लहान सवयींमध्ये बदल करून आरोग्य व जीवनशैली कशी सुधारता येते असे प्रतिपादन डॉ.श्यामकुमार दुसाने यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ.श्यामकुमार दुसाने यांनी गुंफले. ‘निसर्ग उपचार व आरोग्य’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे डॉ.मनोहर मोरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले व निरोगी शरीर हे यशस्वी जीवनाचे प्रमुख साधन असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सृष्टी थोरात यांनी केले तर प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.राजेश शंभरकर यांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.राजेश शंभरकर यांनी परीश्रम घेतले. यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
