
लासलगाव, ता.१७ (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाले अंतर्गत अमली पदार्थांचे युवा पिढीवर होणारे दुष्परिणाम या विषयावर डॉ.बाजीराव आहिरे यांचे व्याख्यान संपन्न झाले. आपल्या व्याख्यानात डॉ.आहिरे यांनी अमली पदार्थांचे विविध प्रकार, त्यांचा शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक जीवनावर होणारा दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भुषण हिरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाता आपला वेळ छंद, क्रीडा, वाचन यांसारख्या सकारात्मक उपक्रमांमध्ये घालवावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सृष्टी थोरात यांनी केले. तर प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.राजेश शंभरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.राजेश शंभरकर यांनी परीश्रम घेतले. यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास प्रा.संदीप ठाकरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
