
नांदगाव:( प्रतिनिधी)- आज समाजातील बालविवाह ही एक गंभीर समस्या असून, ती मुलांच्या विशेषतः मुलींच्या भविष्याला काळिमा फासणारी आहे. या अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे ‘बालविवाह प्रतिबंधक शपथ’ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “बालविवाह हा केवळ कायदाच नव्हे, तर मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. शिक्षण हेच प्रगतीचे साधन असून योग्य वयात विवाह करणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.”
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘मी बालविवाह करणार नाही आणि माझ्या परिसरात असा विवाह होत असल्यास तो रोखण्यासाठी प्रयत्न करेन’ अशी शपथ घेतली.
उपशिक्षक ज्ञानेश्वर पगार यांनी शपथ व बालविवाहाचे दुष्परिणाम आणि त्यासंदर्भातील कायद्यांची (उदा. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६) माहिती दिली.
या उपक्रमासाठी विद्यालयातील उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
