
नाशिक (बातमीदार) दिनांक १३-
इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज मराठी विचार मंच आयोजित ‘मराठीचे उपासक’ ही पदवी लेखी परीक्षा घेऊन मिळविली हे अभिमानास्पद आहे त्याबद्दल मंचचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि साहित्यिक अनिल चौधरी यांनी काढले ते नाशिक सिंधी शिक्षण मंडळाच्या सिंधुसागर अकॅडमी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी देवून सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी काम करणारी कुसुमाग्रज मराठी विचार मंच ही संस्था मराठी भाषेविषयी बालपणापासूनच आवड निर्माण व्हावी आणि सोशल मिडियाच्या विविध साधनांमुळे वाचनाची गोडी कमी होत असल्याने वाचन संस्कृती वाढावी म्हणून खास तयार केलेल्या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेत आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येते, असे मराठीचे उपासक तयार करण्याचे काम संस्था करीत असून गेल्या शैक्षणिक वर्षापासून जवळपास पंधरा हजार विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी मंचाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुमारे तीन लाख मराठीचे उपासक तयार करण्याचे काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे संबंधित विद्यालय इंग्रजी माध्यमाचे असूनही या विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. विजेते पुढीलप्रमाणे (इयत्ता सातवी) प्रथम झा आदित्य प्रशांत द्वितीय क्षीरसागर लक्ष शरद, तृतीय कु. गवळी आरोही राजकुमार (इयत्ता आठवी) प्रथम कु.जगताप स्वराली संजय, द्वितीय कु.चौहान आदिती अटलसिंग, तृतीय कु.पंडित अनुष्का विजय (इयत्ता नववी) प्रथम कु.निकम क्षितिजा माधव, द्वितीय राजपूत कणक नितेंद्र सिंग, द्वितीय झा कौस्तुभ प्रशांत, तृतीय कु.पासवान सुरुची अवदेश. या परिक्षेसाठी प्राचार्या श्रीमती सिमरन मखिजा, समन्वयक प्रियंका खालकर आणि अश्विनी पगारे आणि मंचाचे मंगेश टोणगावकर यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक भगवानदास कच्छेला यांच्यासह मंचाचे अध्यक्ष सतीश बोरा, उपाध्यक्ष दिलीप बारवकर,सरचिटणीस सुभाष सबनीस हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष सबनीस यांनी केले. सतीश बोरा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार दिलीप बारावकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रियांका खालकर यांनी केले.
