
नांदगाव 🙁 प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नांदगाव येथे १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीमध्ये रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ जनजागृतीसाठी तसेच कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर ‘रस्ता सुरक्षा’ या विषयावर बोलताना दिगंबर भदाणे यांनी जीवन किती अमुल्य आहे याची जाणीव ठेवा. वाहन चालविताना नियमांचे पालन करा, युवापिढी आयुष्याला हलक्यात घेत आहे. एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात बाईक अशी रील बनविण्याची फॅशन बनली आहे.

मात्र हे प्रकार आपल्या आयुष्यासाठी धोकादायक आहेत याचा विचार युवावर्गाने तसेच पालकांनीही करावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अपघातांचे प्रमाण कमी करून नागरीकांचे जीव सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहीक जबाबदारी असुन यासाठी प्रत्येकाने वाहतूकीचे नियम काटेकोर पाळणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्यावर भर द्यावा. रस्ता सुरक्षेची सर्वांनीच काळजी घेवूया असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये शाखेचे प्राचार्य एच.बी.ठाकरे यांनी रस्ता सुरक्षा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.शहरात अपघातांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी लोकसंख्येची संख्या पाहता ते चिंताजनक असल्याचे सांगितले. १८ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांनी वाहनांचा वापर करु नये. तसेच प्रत्येक वाहन धारकाने हेल्मेटचा वापर सक्तीने करावा. त्याचप्रमाणे वेगावर नियंत्रण ठेवावे. वाहन चालवताना फोनवर बोलू नये. प्रदुषण होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी. ध्वनी कर्कश आवाजाचे हॉर्न वाहनांना बसवु नये असे अध्यक्षीय भाषणात विषद केले.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे,डी.बी.सोणवणे शाखेचे प्राचार्य एच.बी.ठाकरे, एच.बी.सोनस, ए.बी.वाणी,डी.डी.काकळीज,डी.एस.अमराळे, के. डी.आहेर,निदेशक निदेशकेतर सेवकवृंद व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सुवर्णा भड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.
