
लोहोणेर येथील जनता विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीचे पूजन करताना उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे समवेत उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.(छाया -:सुनिल एखंडे)
लोहोणेर-:(प्रतिनिधी )येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा शुभारंभ ग्रंथपूजन आणि भव्य ग्रंथदिंडीने उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात करण्यात आला. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी मराठी भाषा ही फक्त संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची,परंपरेची आणि ओळखीची मानबिंदू असल्याचे सांगितले. मराठी भाषेबद्दल अभिमान जागवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवणे हा या पंधरवड्याचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पंधरवड्यात वाचनप्रेरणा उपक्रम,कविता वाचन,निबंधलेखन, शब्दसंपदा वाढवा अभियान, वाचनदिंडी, कथाकथन,सामान्यज्ञान स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ग्रंथपूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सजून साहित्यिकांचे ग्रंथ, घोषवाक्यांचे फलक हातात घेत परिसरात ग्रंथदिंडी काढली. उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले.आपल्या मनोगतात ठाकरे यांनी मराठी ही आपली मायबोली, संस्कृतीची शान आणि अभिमान असल्याचे सांगितले. शुद्ध मराठीत बोलणे, लिहिणे आणि वाचनाची सवय लावणे ही नव्या पिढीची महत्त्वपूर्ण जबाबदारी असून पुस्तक आणि भाषा हेच खरे ज्ञानाचे दीपस्तंभ असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.विद्यार्थी सिद्धी शिरसाठ, पार्थ गरुड,अदिती सूर्यवंशी, कल्याणी शिंदे,संस्कृती सूर्यवंशी,हर्षाली बागुल, रितुजा बागुल यांनी मराठी भाषेचा इतिहास,वैशिष्ट्ये आणि आजच्या काळातील महत्व याबाबत मनोगत व्यक्त केले. शिक्षक मुरली भामरे, दिनेश पवार राजू पगारे यांनीही भाषेचे महात्म्य आणि तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेबद्दल मार्गदर्शन केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात आली. पुढील दिवसांत विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल प्रेम, आदर आणि संवर्धनाची भावना वृद्धिंगत केली जाणार असल्याचे सांगितले.मराठी विषय शिक्षक छोटू वाघ,राकेश थोरात, उर्मिला चव्हाण,दशरथ आहेर,नविश्वास जाधव,मनिषा गिरासे, लक्ष्मण देवरे,मयूर सोनवणे,दिपक खांगळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी समन्वय, सजावट आणि आयोजनात मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले.
