
नांदगाव ( प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नांदगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्यावतीने 12 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत ‘राष्ट्रीय युवक सप्ताह’ साजरा केला जात आहे. या अंतर्गत ‘स्वामी विवेकानंदांचे विचार व आजचा युवक’ या विषयावर न्यू इंग्लिश स्कूल नांदगावचे उपमुख्याध्यापक श्री.दिपक चव्हाण यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देताना स्वामी विवेकानंदांच्या जीवनात घडलेल्या विविध घटना व प्रसंगांचे त्यांनी दाखले दिले. देशाचे भविष्य युवकांच्या हाती असल्याने युवकांनी समाजात वावरताना स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आचरण करण्याचे त्यांनी याप्रसंगी आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.यु.पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वामी विवेकानंद सहभागी झालेल्या शिकागो परिषदेत घडलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली. स्वामी विवेकानंद एक आदर्श तत्वज्ञानी व युवकांसाठी सकारात्मक ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, कार्यशाळा, शिबिरे यांच्यात सहभाग घेऊन नेतृत्व गुण विकसित करावा व त्या माध्यमातून देशसेवा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून ‘राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर’चे कार्यक्रम अधिकारी प्रा बी.के.पवार यांनी विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय युवक सप्ताह’ साजरा करावयाचा उद्देश स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे स्मरण व्हावे हा आहे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आदर्श, नेतृत्वगुण व आदर्श राष्ट्रउभारणीची जाणीव वाढविणे असल्याचे सांगितले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

सदर प्रसंगी मंचावर वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.ए.मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम. राठोड, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. पी.एम.आहेर, कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.जी.व्ही.बोरसे, प्रा.ए.के. जाधव, प्रा.अक्षय तुपे,प्रा. सायली बोरसे व प्रा.श्रीमती फापाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.बी.के. पवार यांनी केले. व्याख्यानासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. सी.पैठणकर यांनी परिश्रम घेतले.
