
नांदगाव:-(प्रतिनिधी )मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीचा आनंद लुटताना वापरल्या जाणाऱ्या घातक नायलॉन मांजावर बंदी घालण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आज मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात विशेष ‘मांजा प्रतिबंध’ शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला.
पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन किंवा चिनी मांजा केवळ पक्ष्यांसाठीच नव्हे, तर मानवी जीवनासाठीही अत्यंत घातक ठरत आहे. या मांजामुळे दरवर्षी अनेक निष्पाप पक्ष्यांचा मृत्यू होतो आणि नागरिकही जखमी होतात. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका ज्योती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
शाळेच्या प्रांगणात उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे,सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी एकत्र जमले होते. “मी पतंग उडवण्यासाठी कधीही नायलॉन किंवा काचयुक्त मांजाचा वापर करणार नाही, तसेच इतरांनाही त्यापासून परावृत्त करेन. मुक्या पक्ष्यांच्या जीवाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे,” अशी सामूहिक शपथ यावेळी उपशिक्षक वासुदेव कवडे यांनी सर्वांनी दिली.
याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका ज्योती काळे सांगितले की, “सण हा आनंद साजरा करण्यासाठी असतो, कोणाचा जीव घेण्यासाठी नाही. विद्यार्थ्यांनी ‘सृष्टीचा मित्र’ बनून सण साजरा करावा.” विज्ञान शिक्षकांनी नायलॉन मांजा निसर्गात विघटित होत नसल्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाली असून, “आम्ही फक्त सुती दोरा (साधी मांजा) वापरूनच पतंग उडवू,” असा निश्चय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
