
तासदरा (ता. सिन्नर) येथे शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पांढुर्ली बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विजय बागुल व विंचूर-दळवी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय खैरनार साहेब यांच्या संनियंत्रणाखाली शिक्षण परिषद झाली. दुर्गम व डोंगरदऱ्यात वसलेल्या व घनदाट जंगलाने वेढलेल्या निसर्गरम्य परिसरात तासदरा वस्ती हे गाव वसलेले असून, अशा ठिकाणीही दर्जेदार शैक्षणिक उपक्रम राबवले जात असल्याचे या परिषदेच्या निमित्ताने दिसून आले. पीजीआय इंडिकेटर्स बाबत श्रीमती भारती अहिरे, शिष्यवृत्ती परीक्षा विषयावर श्रीमती कावेरी बोराडे तर विद्यांजली पोर्टल बाबत आप्पासाहेब जावळे यांनी माहिती दिली. प्रशासकीय कामकाज या विषयावर केंद्रप्रमुख विजय खैरनार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. विजय बागुल यांनी विद्यार्थी सुरक्षितता, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा आढावा तसेच विविध शासन निर्णयांचे वाचन करून मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेत झालेल्या गणितीय खेळ स्पर्धेत कांचन एखंडे व आप्पासाहेब जावळे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. डॉ. विजय बागुल साहेब यांचे हस्ते यशस्वी स्पर्धकांना पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर निसर्गरम्य वातावरणात केंद्रातील सर्व शिक्षक बांधवांनी वनभोजनाचा आनंद घेतला. शाळेचा कायापालट करून तिला सुंदर स्वरूप देण्यासाठी मुख्याध्यापक कैलास शेळके सर व उपशिक्षक तानाजी म्हस्के यांनी विशेष मेहनत घेतल्याचे सर्वांनी गौरवोद्गार काढले. मुख्याध्यापक कैलास शेळके यांनी प्रास्ताविक केले.मागील शिक्षण परिषदेचा आढावा कल्पना आव्हाड यांनी सादर केला. सौ. वैशाली वालझाडे यांनी आभार मानले.
