
नांदगाव (वार्ताहार ) व्ही.जे.हायस्कूल, नांदगाव येथे वारली चित्रकला प्रदर्शन नुकतेच भरविण्यात आले आहे होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक योगेश निकम, संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष संजीव धामणे, प्रमुख पाहुणे रविंद्र पवार, संस्थेचे सहखजिनदार हेमंत देशपांडे, कार्यकारिणी सदस्य राहुल मुळे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्याध्यापक डॉ.जोगेश्वर नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयातील कलाशिक्षक शशिकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील इयत्ता ७ वी ते ९ वी च्या १७ विद्यार्थ्यांनी १३ दिवसांच्या वारली चित्रशैली कार्यशाळेतून आत्मसात करत साकार केलेल्या ८० वारली पेंटिंग तयार केल्या. प्रदर्शनामध्ये त्यापैकी निवडक व उत्कृष्ट ४४ पेंटिंगचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. चित्रात वारली, इंडियन आर्ट, मंडल आर्ट अशा तीन शैलीच्या संयोजनातून विद्यार्थ्यांनी चित्रे साकारली होती. या चित्रांत रामायण, महाभारत, शिवकालीन प्रसंग, लग्न समारंभ, ग्रामीण जीवन, निसर्ग, धार्मिक विधी, वन्य प्राणीजीवन अशा विविध विषयांचा समावेश कौशल्यपूर्ण रीतीने करण्यात आला होता.

वारली चित्रशैली सारख्या अत्यंत प्राचीन असणाऱ्या कलेचा वारसा जपून ठेवणे, त्याचा प्रसार करणे हे कला क्षेत्राच्या संवर्धनासाठी आवश्यक असल्याचे कलाशिक्षक शशिकांत खांडवी यांनी सांगितले. या कलेतील मूळ आधाराला धक्का न लावता त्यातील सृजनशीलता कशी वाढवावी याचे मार्गदर्शन त्यांनी मुलांना कार्यशाळेतून केले. विद्यालयाच्या स्नेहसंमेलन दरम्यान भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनास स्थानिक अधिकारी, पालक, परिसरातील नागरिक यांचा भरघोस प्रतिसाद पहावयास मिळाला. प्रदर्शनातील चित्रांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. तसेच पुढील कार्यशाळेत आपल्या मुलांना प्रवेश मिळावा यासाठी आग्रह धरला.

प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन रूपाली झोडगेकर यांनी केले तर आभार गुलाब पाटील यांनी मानले. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी शाळेतील जेष्ठ कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे, विजय चव्हाण, ज्ञानेश्वर डंबाळे, गणपत बेजेकर, गिरीष निकम, गणेश गोटे आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.
