
नाशिक. ( प्रतिनिधी ) समाजात वावरताना आजूबाजूचे सूक्ष्म निरीक्षण व खडतर परिस्थितीतून माणूस घडत असतो असे प्रतिपादन भारती देव यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात २१४ वे पुष्प गुंफतांना ईच्छा या पुस्तकावर भारती देव ऐसपैस गप्पा करत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगाचार्य अशोक पाटील होते.
भारती देव पुढे म्हणाल्या की, आज सामाजिक परिस्थिती बदली असून, त्या भोवती अदृश्य असे भयंकर जग निर्माण झाले आहे. आज प्रत्येक माणसाला दुर्दैवाने पोटासाठी सामना करावा लागतो. तर काहींना पोटासाठी लढा द्यावा लागतो. अनेक लोक समस्येच्या तावडीत सापडतात. तावडीतून त्यांना परतीचा मार्ग मात्र सापडत नाही. त्या ठिकाणी अनेकांना त्या छडयंत्रात स्वतःला गमवावे लागते.आपण समाजाचे देणे लागतो. मनात सामाजिक बांधिलकी जरी असली, तरी आज काही समस्या आपल्याला दूरवर आणि खोल खोल अशा जगात घेऊन जातात. की जिथे अब्रूचे धिडवाडे निघतात.आणि सामान्य माणूस मात्र हवालदिल होतो. त्यासाठी त्याला न्याय मिळाला पाहिजे. अशा अनेक मनाला भिडणाऱ्या कथा मांडून मनाला दिलासा देणारे प्रसंग मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक घाव दोन तुकडे असे आपल्याला वाटत असले तरी, न्याय लवकर मिळत नाही त्यामुळे माणसाची होणारी तगमग आणि जीवाची घालमेल, झालेली तडफड माणसाला चैन पडू देत नाही. त्यावेळी अनेक कथांचा जन्म होतो. धानी, चकाकणारे पाणी, चिंधी, इच्छा, वचपा, उपवास,सबूत, मांजराची गोष्ट,मूक साक्ष, आता पुढे काय, चेकमेट, आणि अपेक्षित सुटका अशा कथांमधून मानवी मूल्य आजही प्रलंबित आहेत. आपण मात्र त्याच वेदना तेच दुःख सोसत गप्प राहतो. कारण त्यामुळेच या जगात दृष्टांचे अधिक चालते.आणि आपण सुज्ञ असूनही आपल्याला शेवटी न्यायाची प्रतीक्षा करावी लागते. हे विदारक सत्य आपल्याला नरकात घेऊन जात असते. त्यासाठी आपण सक्षम बनले पाहिजे.
यावेळी या मधुकर गिरी, राजेंद्र देसले या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
आभार दतू दाणी यानी मानले. तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या 2 जानेवारी रोजी जगदीश देवरे फुलपाखरू या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
