
रमाकांत नारायणे
ढोर समाजाच्या साहित्य क्षेत्रातील अभूतपूर्व प्रगतीकडे लक्ष वेधणारी ही बातमी, तीन दिवसांत पाच पुस्तके (एका दिवसात तीन!) प्रकाशित होण्याच्या विक्रमातून समाजाची तीव्र वैचारिक आणि साहित्यिक जागृती दर्शवते, जिथे आजवर ५३ लेखक-कवींनी २६० पुस्तके दिली, ज्यात महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाच्या पुरस्कारांनी गाजलेल्या, विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या आणि ‘७२ मैल’सारख्या कादंबरीवर चित्रपट आलेल्या साहित्यकृतींचा समावेश आहे. काही लेखकांच्या पुस्तकांवर संशोधकांनी एम.फील. ही केले आहे तर काहींच्या पुस्तकावर संशोधक पी.एच.डी. करत आहेत. यातून ढोर समाजाचे साहित्यिक, कवी आणि संशोधक आपले अनुभव, इतिहास व सामाजिक प्रश्न सातत्याने प्रभावीपणे मांडत आहेत, हेच सिद्ध होते. तीन दिवसात प्रकाशित झालेली पुस्तके.
१. २६ डिसेंबर रोजी लेखक आणि कवी श्री.जयराम सोनावणे यांच्या ‘जयऱ्या’ या आत्मचरित्राचे प्रकाशन माननीय माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते एम.आय.जी. क्लब वांद्रे येथे झाले.
२. २७ डिसेंबर रोजी इंजि. श्री. रमाकांत नारायणे यांच्या ‘ढोर समाज आणि समाजाचे शिल्पकार’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन धारावी येथे श्री. गणेश विद्यामंदिर येथे झाले. यावेळेस समाजातील मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती दर्शविली आणि हे पुस्तक म्हणजे ढोर समाजाचा ऐतिहासिक ठेवा आहे, असे अनेकांनी प्रतिपादन केले. तसेच नारायणे साहेब तुम्ही लिहित रहा, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत करावयास तयार आहोत अशी अनेकांनी मते मांडली.
३. २८ डिसेंबर रोजी ढोर समाजातील साहित्यिक आणि कलाकार यांचा अभूतपूर्व मेळावा एस.एन.डी.टी. कॉलेज पुणे येथे संपन्न झाला. या मेळाव्यात लेखक कवी आणि गझलकार डॉ. सुभाष कटकधोड यांच्या ‘मातीचा देह’ या सोळाव्या पुस्तकाचे प्रकाशन माननीय माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. त्याच कार्यक्रमात यांच्याच हस्ते कवी, लेखक आणि गझलकार डॉ. नरसिंग इंगळे यांच्या ‘कैलास मानस एक अदभूत यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
४. २८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध लेखक, कवी धनराज खरटमल यांच्या ‘खस्ता’ या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा वाशीतल्या प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाच्या साहित्य मंदिर सभागृहात पार पडला. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्राजक्त देशमुख यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री अनिता दाते, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, बाल साहित्यिक मोहन काळे,शास्त्रज्ञ-विज्ञान लेखक शरद काळे, लेखक राजीव श्रीखंडे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालीच्या विश्वस्त डॉ. लतिका भानुशाली यांनी केले. लेखकाने मनोगतातून त्याची भूमिका स्पष्ट केली.
एकाच वेळी पाच पुस्तकांचे प्रकाशन होणे ही घटना समाजातील इतर होतकरू लेखकांसाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे. ही घटना केवळ ढोर समाजासाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या एकूणच पुरोगामी साहित्य चळवळीसाठी एक महत्त्वाची ऐतिहासिक नोंद आहे.
