
मनमाड – येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती, शिवराय व डॉ.विक्रम साराभाई यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी शालेय समिती प्रमुख श्री. दामुअण्णा पाटील तर उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब साळुंखे हे होते. मंचावर मान्यवर श्री.मोहनदादा आहेर,श्री. सिद्धांर्थ संसारे,श्री.नरेद्र कांबळे,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.डी. गव्हाने, अभिनव बालविकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आर.वाघ उपस्थित होते.

आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल च्या मुख्याध्यापिका आहेर शितल यांनी प्रास्ताविकात छंद विज्ञान प्रदर्शनाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृती दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विज्ञान प्रदर्शन हे इयत्ता पहिली ते आठवी दोन गटात घेण्यात आले.विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी २० वैज्ञानिक उपकरणे सादर केली. मान्यवरांच्या वतीने उपकरणांचे निरीक्षण करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनात मांडलेल्या जलशुद्धीकरण आम्ल वर्षा, सूर्यमाला, स्मार्ट ब्रिज, स्मार्ट सिटी, चंद्रयान, हायड्रोलीक जेसीबी,शेतीपिकांसाठी उपयुक्त तोफ,वॉटर प्रेशर गॅझेट,हाऊस सेफ्टी अलार्म,सोलर स्प्रे पंप, ज्वालामुखी,अशा विविध उपकरणांची माहिती घेत मान्यवर श्री. सिद्धांर्थ संसारे,श्री.नरेद्र कांबळे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांनी आपल्या उपकरणांविषयी माहिती देत प्रश्नांची उत्तरे दिली.म.वि.प्र. नांदगाव संचालक श्री.अमितभाऊ बोरसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.यावेळी प्राचार्य डाँ. डि. डि गव्हाने यांनी आपले मनोगत व्यक्त करत विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे त्याचबरोबर आपल्यात असलेल्या संशोधक वृत्तीला चालना मिळण्यासाठी अशा प्रदर्शनात जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन केले. विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपस्थित सर्वच शिक्षिका, केतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
