
सिन्नर : चांडकं कन्या विद्यालय, सिन्नर या शाळेच्या प्रांगणात शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेत आपले कौशल्य, चिकाटी व संघभावना दाखवून दिली. प्रत्येक खेळामध्ये विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रेक्षणीय कामगिरी पाहायला मिळाली. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, डॉजबॉल, लंगडी, लिंबू-चमचा, स्लो सायकलिंग, गोळाफेक व दोरी उडी अशा विविध खेळांमध्ये थरार रंगला.

या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा प्रशिक्षक श्री. एस. डी. जाधव, शाळा समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे उपस्थित होते. पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. पालक-शिक्षक संघाच्या वतीने गोरक्ष सोनवणे यांनी शुभेच्छा देत आरोग्य जपण्याचा संदेश दिला. क्रीडा शिक्षिका प्रतिभा वाढवणे व स्नेहल आरखडे यांनी विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृषाली बोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्तम भोये यांनी केले.
