
मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कुस्तीमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक वृंद.
नांदगाव (प्रतिनिधी): भारतीय कुस्तीला जागतिक पटलावर ओळख मिळवून देणारे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जयंतीनिमित्त मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात ‘राज्य क्रीडा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना खाशाबा जाधव यांचा संघर्ष आणि १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधील त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल माहिती दिली. “जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सामान्य कुटुंबातील मुलगाही जगावर नाव कोरू शकतो,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र सरकारने २८ ऑगष्ट २०२३ पासून ‘ राज्य क्रीडा दिन ‘ सुरू केला.
या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने खो-खो, लंगडी, धावणे यांसारख्या मैदानी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळातही विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवणे आवश्यक आहे. खेळामुळे शिस्त, सांघिक भावना आणि आरोग्य उत्तम राहते. खाशाबा जाधव हे महाराष्ट्राच्या मातीतील एक प्रेरणास्थान आहेत.”
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
