
१७ तारखेला सिन्नर येथे धरणे आंदोलन व लक्षणीय उपोषण
सिन्नर–संगमनेर–अकोले–नारायणगाव–चाकण रेल्वे कृती समिती, सिन्नर यांच्या वतीने आज नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कृती समितीचे श्री. हरिभाऊ तांबे, सीमा संघटनेचे सचिव बबन वाजे, दत्ताजी वायचळे, भाऊसाहेब शिंदे, नामदेवराव कोतवाल, विठ्ठल जपे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात नाशिक–पुणे प्रस्तावित रेल्वे मार्ग सिन्नर–संगमनेर–आळेफाटा–नारायणगाव–चाकण या मार्गेच व्हावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. हा मार्ग सिन्नर तालुक्यासह परिसरातील उद्योजक, व्यापारी, शेतकरी तसेच पुण्यात शिक्षणासाठी जाणारे हजारो विद्यार्थी व आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या युवकांसाठी अत्यंत सोयीचा व लाभदायक असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.
याउलट पुन्हा पुणतांब्यावरून रेल्वे मार्ग नको, अशी भूमिका कृती समितीने ठामपणे मांडली आहे. सदर मार्गामुळे सिन्नर व परिसराचा औद्योगिक, शैक्षणिक व आर्थिक विकास साधला जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या मागणीसाठी येत्या शनिवारी दि. १७ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सिन्नर येथे धरणे आंदोलन व लक्षणीय उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे कृती समितीच्या वतीने देण्यात आली. या आंदोलनात सर्व उद्योजक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
