
नांदगाव( प्रतिनिधी)कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या वतीने आयोजित ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात’ या. प्रभाकर निकुंभ (अध्यक्ष, वन्यजीव संवर्धन समिती, नांदगाव) यांचे ‘वन्यजीव संवर्धन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.सदर प्रसंगी व्याख्याते या. प्रभाकर निकुंभ यांनी विद्यार्थ्यांना मानवजातीच्या कल्याणासाठी वन्यजीवांचे संवर्धन करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून शून्य सर्पदंश जनजागृती उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सापांच्या विविध प्रजातींची माहिती दिली. त्यातील विषारी व बिनविषारी साप कोणते आहेत हे पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समजावून दिले. सापांविषयी समाजात अंधश्रद्धा व गैरसमज आढळतात.

त्यांनी विद्यार्थ्यांना सदर गैरसमजांचे निराकरण करण्यासाठी विविध उदाहरणे दिली. सर्पदंश झाल्यानंतर प्रथमोपचार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले. सदर व्याख्यान प्रसंगी मंचावर मंगेश आहेर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. लव्हाटे, प्रा.गोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे कला व वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा. जी.व्ही.बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिबीरार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.सी.पैठणकर व सहाय्यक प्रा.टी.एन.आहेर यांनी परिश्रम घेतले.
