
लासलगाव, ( प्रतिनिधी) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर अंतर्गत दि. 23/12/2025 ते दि. 29/12/2025 या दरम्यान आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा श्रीक्षेत्र संतवन, खेडलेझुंगे येथे अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच प्रतिमा पूजनाने करण्यात झाली. विद्यार्थिनींनी स्वागत गीतातून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री.प्रकाश पाटील हे उपस्थित होते. तर उदघाटक म्हणून योगीराज तुकाराम बाबा संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.रघुनाथ महाराज खेडलेकर लाभले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नू.वि.प्र. मंडळाचे खजिनदार श्री.अनिलशेठ डागा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांची उपस्थिती लाभली. तसेच याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, सरपंच सौ.माया सदाफळ, उपसरपंच श्री.विश्वनाथ घोटेकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.मच्छिंद्र साबळे, तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री.अशोक घोटेकर, श्री.विजय सदाफळ, प्राचार्य श्री.लहानु ठाकरे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा. पुनम आहेर, प्रा.निकिता चव्हाण, प्रा.श्रेया जगताप, डॉ.मारोती कंधारे, प्रा.जितेंद्र देवरे, प्रा.रामनाथ कदम, प्रा महेश होळकर तसेच खेडलेझुंगे ग्रामपंचायतचे सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य, तंटामुक्ती समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व रा.से.यो. स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले योगीराज तुकाराम बाबा संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. रघुनाथ महाराज खेडलेकर यांनी विद्यार्थ्यांना श्रम व संस्कार यांचे महत्त्व तसेच राष्ट्रनिर्मितीत युवकांचा सहभाग या गोष्टी समजावत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांमध्ये संस्काराची जडणघडण होते. आणि हे संस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जातात असे प्रतिपादन केले. लासलगाव महाविद्यालयाच्या वतीने श्रीक्षेत्र संतवन, खेडलेझुंगे येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तर नू.वि.प्र. मंडळाचे खजिनदार श्री.अनिलशेठ डागा यांनी जीवनात शिबिराचे महत्व सांगताना सर्व स्वयंसेवकांनी आपल्या कामातून गावात ठसा उमटविण्याचे आवाहन करून श्रमदान करण्याचे आवाहन केले. यानंतर प.पू. तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.लहानु ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक सहभागाचे कौतुक केले. अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते, नेतृत्व गुण विकसित होतात असे नमूद केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी रा.से.यो. स्वयंसेवकांनी शिबिराच्या माध्यमातून समाजविकास व व्यक्तिमत्वाचा विकास साधावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर यांनी केले, डॉ.संजय शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये शिबिराचा उद्देश, सात दिवसाचे नियोजन, होणारे उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली. तर प्रा.देवेंद्र भांडे यांनी आभार मानले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे हे विशेष श्रमसंस्कार शिबिर नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.गोविंदरावजी होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक या ठिकाणी संपन्न होत आहे.
