
मांडवड (प्रतिनिधी)मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव येथे वीर बाल दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी सामाजिक क्षेत्रात तसेच पर्यावरण संवर्धन व गरजू तसेच निराधार लोकांना मदत करण्यासाठी अग्रेसर असलेला युवक ओम संजय ठाकूर तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी ईश्वर शंकरराव पवार यांनी क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना निमंत्रित करण्यात आलेले होते.सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल, नांदगावचे जेष्ठ शिक्षक अशोक मार्कंड होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशोक मार्कंड यांनी छोट्या छोट्या चांगल्या समाजोपयोगी गोष्टींवर लक्ष घालावे. पर्यावरणाचे संवर्धन करावे. प्राणी मात्रांवर भूतदया दाखवावी. तसेच शौर्य गाजवण्यासाठी सैनिकी सेवेतच जाण्याची आवश्यकता नसून स्थानिक पातळीवरील छोट्याछोट्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला तरी समाजकार्य घडत असते.अपघातग्रस्तांची मदत करा. भ्रष्टाचाराला थारा देऊ नका. अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य एच. बी. ठाकरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना आवाहन केले की आज समाजामध्ये अनेक गरजू तसेच बेसहारा लोक आहेत त्यांना आपल्या परीने छोटेखानी मदत करावी. त्यांना गरजेनुसार तसेच आपल्या परिस्थितीनुसार सहकार्य करावे. तसेच आजच्या तरुणाईमध्ये अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांचे लक्षणे दिसून येतात. तसेच आजची युवा पिढी ही सोशल मीडियाच्या अधीन गेलेली दिसते तरी या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी योगाभ्यास तसेच व्यायाम व खेळाकडे विशेष लक्ष केंद्रित करावे जेणेकरून आजची पिढी सक्षम होईल व रोगराई हद्दपार होईल आणि हीच खरी आजच्या वीर दिवसासाठी आदरांजली ठरेल असे अध्यक्षीय भाषणात विशद केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एच.बी.ठाकरे होते प्रास्ताविक निदेशक आर.आर.चव्हाण यांनी केले तर आर.एस.बोराळे व एस.बी.बोरसे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस यु टेंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डी.डी काकळीज यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेतील निदेशक निदेशकेतर कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय मूल्य व शौर्य याबाबतची शपथ घेऊन तसेच राष्ट्रगीताने झाली.

