
जळगाव निंबायती (वार्ताहर) – यश ही कुठलीही जादूची कांडी नसून जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वासाने घेतलेली मेहनत आणि प्रामाणिकपणा या गुणांमधूनच यशप्राप्ती होते. ध्येय निश्चित करुन पूर्ण ताकदीने झटले पाहिजे असे प्रतिपादन नाशिक येथील एस. एस. पी झेस्टचे संचालक प्रा. सुनिल पाटील यांनी केले ते येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्यवसाय मार्गदर्शन व नवीन शैक्षणिक संधी या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. पी. जी. माने होते.

समवेत प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा परीक्षांसाठीच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी जिद्द, कष्ट, वेळेचे शिस्तबद्ध नियोजन आणि आत्मविश्वास या गुणांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी अधिकाधिक आवांतर वाचन करावे असे आवाहन प्रसंगी प्रा. पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. अमोल अहिरे यांनी केले, परिचय प्रा. सी. डी. राजपूत यांनी करुन दिला तर आभार प्रा. पी. यु. शिंदे यांनी मानलेत.
