
नांदगाव ( प्रतिनिधी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या वतीने आयोजित ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात’ आज गुरुवार, दिनांक 25/12/ 2025 रोजी ‘ऊर्जा, कृषी व पर्यावरण क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी तरुणाई’ या विषयावर प्रा.जी.व्ही.बोरसे यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना प्रथमतः ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना सविस्तर समजावून दिली.आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या लोकसंख्येच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी, मानवी जीवन भौतिक सुखसुविधांनी सुखकर व्हावे यासाठी ज्या कृती केल्या जात आहे त्यामुळे मोठा धोका निर्माण झाल्याचे सांगितले. ज्या वेगाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विकासाची घोडदौड चालू आहे ती आता रोखता येणार नाही परंतु दीर्घकालीन विचार करून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदल घडवून आणणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

ऊर्जेची आवश्यकता आहेच ती टाळता येणारच नाही परंतु पारंपारिक ऊर्जा साधनांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्यामुळे पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागतं त्यासाठी अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे काळाची गरज असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेच्या वापरावर भर दिला गेला पाहिजे, सौर उर्जेवर वापरली जाणारी उपकरणे यांचा दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर वापर केला पाहिजे या संदर्भात युवकांनी समाजात जनजागृती केली पाहिजे, पेट्रोल-डिझेलवर चालणारी दुचाकी,चारचाकी वाहने प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत असतात म्हणून इलेक्ट्रिक व्हेईकल्स वापरावर भर दिला पाहिजे यामुळे आर्थिक बचत होते व पर्यावरणीय प्रदूषण कमी होते हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. कृषी क्षेत्रामध्ये रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केल्याने मृदा संवर्धन होते व जमिनीची सुपीकता टिकून राहते म्हणून सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे.समाजात त्या संदर्भात जनजागृती करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.पर्यावरणीय असंतुलन कमी करायचे असल्यास मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पाठवून दिले. आज अति पर्जन्यवृष्टी, दुष्काळ, हवामान बदल जागतिक उष्मीकरण, हरितगृह वायूंचे उत्सर्जन, ओझोन वायूचा थर कमी होणे यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आपण सर्व तोंड देत आहोत. या समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला प्रदूषण नियंत्रित करावे

लागेल, वृक्षतोड थांबवावी लागेल, वृक्षारोपण करावे लागेल ,जमिनीचे प्रतवारी टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल, तंत्रज्ञानाचा अतिरिक्त वापर कमी करावा लागेल. दैनंदिन जीवनात बाजारपेठेतून घरी प्रत्येक वस्तू आणताना आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आणतो. त्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे मोकाट गुरे जनावरांच्या पोटात ते जाते त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते, मातीची प्रतवारी खराब होते, मृदा व जल सुद्धा प्रदूषित होते म्हणून प्लास्टिक वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी शिबिरार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. शिबिरार्थी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. सी. पैठणकर यांनी परिश्रम घेतले.
