
‘सेल्फी’ एकांकिकेने आत्मविश्वासाचा सशक्त संदेश देत पारितोषिकांवर नाव कोरले
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आज नाशिक येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि कलात्मक वातावरणात पार पडली. संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विविध विषयांवर आधारित तब्बल ३० एकांकिकांनी सहभाग घेतला होता. अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि सादरीकरणाच्या कसोटीवर उतरत ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध अभिनेते श्री. दीपक करंजीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी डॉ. भरत केळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. ए. जी. कुलकर्णी आणि सेक्रेटरी श्री. अश्विनीकुमार येवला यांची प्रमुख उपस्थिती मंचावर लाभली. मान्यवरांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
या चुरशीच्या स्पर्धेत चांडक कन्या विद्यालयाच्या ‘सेल्फी’ या एकांकिकेने शहरी विभागातून प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आशयघन लेखन, प्रभावी दिग्दर्शन, संवेदनशील अभिनय आणि सुसंगत नेपथ्य यांच्या बळावर या एकांकिकेने परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकली आणि विद्यालयाच्या यशोगाथेत आणखी एक सुवर्णपान जोडले.
या एकांकिकेचे लेखन संयुक्ता कुलकर्णी यांनी केले असून, त्यांनी आजच्या समाजातील तरुणाईला भेडसावणाऱ्या दिखाव्याच्या मानसिकतेवर अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे.
‘सेल्फी’ या एकांकिकेतून —
“आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी कोणत्याही मेकअपशिवाय आपल्या चेहऱ्याला तेज देते. सुंदर दिसणं महत्त्वाचं नाही, तर स्वतःला स्वीकारणं महत्त्वाचं आहे. लोकांच्या नजरेत परफेक्ट दिसण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत परफेक्ट असणं गरजेचं आहे,”
हा अत्यंत अर्थपूर्ण व काळाला साजेसा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
विशेष बाब म्हणजे, संस्थेतील सर्व ३० नाटकांमधून सर्वोत्कृष्ट स्त्रीपात्र व सर्वोत्कृष्ट पुरुष पात्र या दोन्ही विभागांतील प्रथम पारितोषिके चांडक कन्या विद्यालयाने पटकावली.
सर्वोत्कृष्ट स्त्रीपात्र अभिनयाचा सन्मान आरोही ठोके हिने मिळवला, तर सर्वोत्कृष्ट पुरुष पात्र अभिनयाचे पारितोषिक स्नेहल चकोर हिने आपल्या प्रभावी अभिनयाच्या जोरावर पटकावले.
तसेच एकांकिकेच्या एकसंध मांडणीसाठी आणि कलाकारांकडून सर्वोत्तम अभिनय करवून घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक संयुक्ता कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आले.
या दैदिप्यमान यशामागे विद्यालयाचे अध्यक्ष अॅड श्रीराम क्षत्रिय, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे, नेपथ्यकार सोनाली मोरे, संगीतकार दीपक गायकवाड तसेच संपूर्ण नाट्यसंघाचे मार्गदर्शन, मेहनत आणि संघभावना मोलाची ठरली.
या यशामुळे चांडक कन्या विद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेला नवे बळ मिळाले असून, विद्यार्थिनींच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळत असल्याचे अधोरेखित झाले आहे. ‘सेल्फी’ एकांकिकेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
