
नाशिक- (प्रतिनिधी ) कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय गंगापूर रोड नाशिक येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक – कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन म्हणून राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार प्रात्यक्षिक सादरीकरण कार्यक्रम घेतला. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःमधील , कुटुंबातील आणि समाजातील अंधश्रद्धां व त्यांच्या निर्मूलनासाठी जाणिवजागृती निर्माण होण्यासाठी विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. गोराणे यांनी केले. वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या, तो तपासण्याच्या पाच पायऱ्या आणि चमत्कारांमागे हातचलाखी , सराव, विज्ञानाचे नियम आणि रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो हे स्पष्ट करण्यासाठी अंधश्रद्धेची बेडी सोडवणे, रिकाम्या तांब्यातून पुन्हा पुन्हा तीर्थ काढणे, तांब्यात भूत गाडणे, लिंबातून करणी काढणे, अधांतरी वस्तू तरंगवणे इ. प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार, जेष्ठ विज्ञान शिक्षक सुनिल अहिरे उपस्थित होते. मुख्याध्यापक संजय पवार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व विकसित करण्यासाठी आज दाखवलेले प्रयोग निश्चितच प्रेरणादायी आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा गांगुर्डे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले.
