
नाशिकरोड ( प्रतिनिधी ): महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिकरोड शाखेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘शिवयुगाची स्मरणगाथा’ हा सांस्कृतिक व साहित्यिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवचरित्रावर आधारित भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी साकारलेल्या कलात्मक आणि आकर्षक रांगोळ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.या सोहळ्यात शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख (सिन्नर) यांचा ‘शिवसाहित्यिक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना शिवचरित्रावरील विचार मांडण्याची संधी मिळाली. त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी विवेचनाला साहित्यप्रेमी श्रोते तसेच माता-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले उपस्थित होते. त्यांनी सामाजिक व धार्मिक कार्याविषयी मार्गदर्शन केले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, छायाचित्रकार तसेच अजिंठा लेणी येथील भित्तीचित्र संवर्धन कार्यात मोलाचे योगदान देणारे प्रसाद पवार होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम अनुभवण्याची संधी मिळाल्याचा आनंद उपस्थितांनी व्यक्त केला.याप्रसंगी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी, महाराष्ट्र माझा परिवारचे बंटीशेठ भागवत, शिवाजी हांडोरे, चतुर सर, बापूशेठ ढिकले, फरजभाई शेख, लेखक डॉ. संजय पवार, शिवव्याख्याते शरद डुंबरे, चित्रकार राहुल पगारे यांच्यासह अनेक साहित्यिक, परिषदेचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नाशिकरोड शाखेचे अध्यक्ष उन्मेष गायधनी, अनिल पवार, उपाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, कवी प्रशांत केंदळे, कवी राजेंद्र उगले तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांचे उपस्थितांनी विशेष अभिनंदन केले.
