
नाशिक:- (प्रतिनिधी )सतत फिरस्ता असलेला आणि दुर्गम भागात राहूनही बंजारा समाजाने आपल्या चालीरीती जपल्या आहेत. या समाजाच्या विविधांगी लोकजीवनाचे चित्रण करता आले. त्यातून निर्माण झालेली गोरमाटी ही साहित्यकृती म्हणजे समाज-संस्कृतीचा आरसा आहे, असे प्रतिपादन प्रा.सलतान राठोड यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात प्रा.सलतान राठोड ‘गोरमाटी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी अजित कुलकर्णी होते. प्रा.राठोड पुढे म्हणाले की, भारत हा विविध संस्कृती जपणारा देश आहे. या देशात सर्व समाज आपापल्या संस्कृती जपत असतात. गोरमाटीमधून बंजारा समाजाचा पोशाख, लग्नाच्या विविध पद्धती, व्यवहारनीती, व्यापारी धोरण यांचे चित्रण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बंजारा समाजातील अशिक्षित महिलांनी आजही संस्कृती टिकवून ठेवली आहे, असेही ते म्हणाले. राजेंद्र भोये आणि रोहित वाघमारे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन आणि सुनंदा पाटील यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२२) रोजी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त अशोक कुमावत ‘उठा,तुम्ही जिकंणारच!’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
