

लेखक:शंकर नामदेव गच्चे नांदेड प्रा.शा.वायवाडी मोबाईल नंबर -8275390410
क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले.जन्म ११ एप्रिल १८२७, मृत्यू २८ नोहेंबर १८९०अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना मान,सन्मान,स्वाभिमान मिळवून देणारे क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती त्या निमित्त हा छोटासा लेखन प्रपंच समाजातील उपेक्षित,शोषित,पिढीत यांना पुढे नेण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करणाऱ्या क्रांतीसूर्याचा आज जन्म दिवस. समाजाने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच त्यांना मानाची सन्मानाची *महात्मा*ही पदवी देऊन गौरवले आहे. ज्योतीबांचे पूर्वज सातार्यापासून जवळ असलेल्या कटगुण गावात राहात होते.जोतीबाचे आजोबा छटीबा यांना तीन मुले होती राणोजी,कृष्णाजी,गोविंदराव त्यांचा फुलांचा व्यवसाय होता,त्याची ख्याती सर्वञ पसरली ती पेशव्यांपर्यंत गेली.पेशव्यांनी या तीन बंधूची जिद्द,चिकाटी पाहून त्यांना 35 एकर जमीन बक्षिस म्हणून दिली. फुलांच्या व्यवसायामूळे सर्व लोक त्यांना फुले म्हणू लागले.त्यावेळी त्यांचे आडनाव गोऱ्हे असे लावले जाई. पुढे गोऱ्हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तेथे ज्योतीबांचे वडील गोविंदराव फुलांचा व्यवसाय करून उपजीविका करीत होते. त्यांनी फ़ुलांच्या व्यवसायात कौशल्य, कीर्ती, आणि यश मिळविले त्यामुळे गोऱ्हे हे आडनाव जावून त्यांना ‘फुले’ हे नाव कायम स्वरूपीच मिळाले. फुले कुटुंबाने व्यवसायात नाव कमावले, पैसाही कमावला. पैशाची आवक वाढल्याने राणोजीची नियत बिघडली व त्याने धंद्यावर ताबा मिळवून कृष्णाजी व गोविंदरावांचा व्यवहारात घात केला. त्यांना या धंद्या पासून वेगळे व्हावे लागले. राणोजीने नंतर एकट्यानेच हा व्यवसाय चालवला.इ.स. 1818 साली पेशवाईचा अंत झाला. पेशव्यांचे राज्य गेले. पेशवाई बुडाली व इंग्रजांची सत्ता पुण्यात स्थापन झाली. पेशवाई सोबत फुल्यांचा फुलांचा व्यवसाय बुडाला. गोविंदराव फुले पुण्याजवळच्या खेड्यात माळी म्हणून काम करू लागले व पुण्यामध्ये ते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करू लागले. पुढे गोविंदराव भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागले. त्यात त्यांचा चांगला जम बसला. नंतर गोविंदरावांनी धनकवडीच्या झगडे घराण्यातील चिमणाबाई सोबत विवाह केला. त्यांना दोन मुले झाली. थोरला राजाराम व धाकटा ज्योतिबा. त्याकाळात प्रार्थमिक शिक्षणाची सोय होती. गोर्या मिशनरीच्या शाळा सुरू होत्या. परंतु शिक्षणावर वर्णवाद्यांची मक्तेदारी असल्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना अशा शाळेचा काहीच उपयोग नव्हता. जातीवादाची जड मजबूत घर करून होती.दलितांच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. ब्राह्मण व त्यांची मुलं ही कट्टर विरोध करत असत. ब्राह्मणांचे समाजावर वर्चस्व असल्याने इंग्रज लोक त्यांची सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्या मताला विरोध करत नसत. ज्ञानदानाची भूमिका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गासाठी नव्हतीच.अस्पृश्यांनी धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला तर शिक्षा होत असे. परंतु 1813 साली इंग्रजांनी शिक्षण नितपळ धोरण लागू झाले. या धोरणानुसार सर्वांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे ब्राह्मणेतर मुले शाळेत जाऊ लागली. शुद्र गणल्या जाणाऱ्या वर्गाच्या मुलांना ब्राह्मण वर्गाची मुले विरोध करत असत.धर्म बुडण्याच्या नावाखाली देवी देवतांचा कोप होण्याची भीती दाखवून शुद्र-अतिशुद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. इंग्रज सरकार सर्वांना शिक्षण देण्यास तयार होते परंतु पिढ्यान पिढ्या गावजोशांच्या इशार्यावर संपूर्ण समाज नाचवण्यात हा सनातनीवर्ग यशस्वी झाला असल्याने स्पर्श व अस्पृश्य वर्ग ब्राह्मणांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत असे.गावजोशांचे बोल म्हणजेच देवाचे बोल अशी त्यांची खोलवर भावना रुजली होती. ब्राह्मनांनी संपूर्ण समाजावर पाश आवळलेले होते. इंग्रजांनी मुलांना शाळेत शिकवायला सुरुवात केली व वेगवेगळ्या समाजाची मुलं शाळेत जाऊ लागली.त्यामुळे पुण्याच्या ब्राह्मणांचे पित्त खवळले व त्यांनी या गोर्यांच्या विरोधात प्रचार करायला सुरुवात केली. तो असा की इंग्रज सरकार हिंदूधर्म बाटवणार आहेत. व शिकणार्या सर्वच मुलांना ख्रिश्चन धर्माची शिकवण देऊन सर्वांना ख्रिश्चन बनवणार आहेत. अशिक्षित समाज ब्राह्मणांवर विश्वास ठेवत असल्याने ब्राह्मणांच्या या खेळीस बळी पडला व अनेक लोकांनी आपापली मुले शाळेतून हळूहळू काढून घेतली.जोतीबा मात्र निमुटपणे शाळेत जात होता.हे ब्राम्हणांना बघवत नव्हते. ज्योतीबांचे शाळेत जाणे कसे बंद पडेल याची योजना ते करू लागले. एक दिवस ब्राह्मण कारकून गोविंदरावांना म्हणाला की हे इंग्रज लोक कावेबाज आहेत ते सात समुद्रापलीकडून भारतात आलेत हे भारतातील जमिनी लाटणार आहेत.हे परके लोक आहेत यांना हिंदू धर्म संपवायचा व ख्रिश्चन धर्म वाढवायचा आहे म्हणून ते आपल्या मुलांना मिशनरीच्या शाळेतून ख्रिश्चन धर्माची शिकवण देण्यासाठी शाळेत दाखल करून घेत आहेत.आपला हिंदू धर्म टीकला पाहिजे. म्हणून आपापली मुलं या लोकांच्या शाळेत पाठवायला नकोत.असे म्हणून गोविंदरावांना धर्म बुडल्याची भिती दाखवल्या जात होती.गोविंदरावांना हे मुद्दे पटले व ते कारकुनाच्या बोलाला बळी पडले. ते विचार करू लागले खरे तर हिंदू धर्म टिकला पाहिजे त्यांच्या मनावर ख्रिश्चन मिशनरी च्या विरोधी मतप्रवाह निर्माण झाला आणि दुसर्याच दिवशी ज्योतिबाची शाळा बंद झाली. जोतीबाला त्यांनी मळ्यातील कामाला जुंपले. परंतु शिक्षण बंद झाल्याचे दुःख त्याला इतके झाले की त्याची शिक्षण विषयक नाराजी सतत जाणवत होती. सतत तीन वर्षे ज्योतिबा शेतात काम करत राहिला. त्याच्या मनाची अवस्था सगुणाबाईला कळत होती परंतु गोविंदरावांच्या पुढे तिचे काही एक चालत नव्हते. ती ज्योतीबांचे शिक्षण पूर्ववत चालू कसे करता येईल याबद्दल विचार करू लागली.तिला वाटले गोविंदराव गफार बेग मुन्शी व लेजीट साहेबांचे नक्कीच ऐकतील.म्हणून तिने ज्योतीबांच्या शिक्षणाची कळकळ गफार बेग व लेजीट साहेबांना बोलून दाखवली व एक दिवस या दोघांनीही गोविंदरावांना अज्ञानामुळे गरिबाचे कसे नुकसान होते ते सविस्तर समजावून सांगितले. सगुणाबाई च्या प्रयत्नाला यश आले व गोविंदरावांनी पुन्हा ज्योतिबांना शाळेत टाकण्यास होकार दिला. तीन वर्षे जोतिबाच्या शिक्षणात खंड पडला होता. 1841साली ते परत स्काॕटीश मिशन शाळेत दाखल झाले व प्रत्येक वेळेस प्रथम क्रमांकाने पास होत गेले.सगुणाबाईचे संस्कार व ज्योतिबांची हुशा फळाला आली. सगुणाबाई ज्योतिबाला नेहमी सांगायची तू फार मोठा माणूस झाला पाहिजे. तुला शिकल्या सवरल्यानंतर मानाचे स्थान मिळाले पाहिजे म्हणून बजावून सांगायची व झालेही तसेच जोतीराव घडले ते सगुणाबाईमुळेच. ब्राम्हणांने जोतीबाचे आयुष्य बिघडवण्याचा प्रयत्न केला.तर एका मुस्लिम व ख्रिश्चन माणसाने जोतीबाचे आयुष्य घडवले.जोतीराव इंग्रजी शाळेत जावून इंग्रजी भाषा शिकले.इंग्रजी चांगली समजू लागल्यावर त्यांनी ‘ राईट ऑफ मान ‘ ( मानवाचे हक्क ) हे थाॕमस पेन या इंग्रज लेखकाचे पुस्तक वाचले. आणि त्यांना हिंदू समाजातील व धर्मातील विषमता ईश्वर निर्मित नसून ही मानव निर्मित आहे हे कळले. एके दिवशी ते त्यांच्या परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नात वरातीत गेले.त्यांना त्या वरातीतीतून धक्के मारून काढून देण्यात आले.याचे त्यांना अतिशय दुःख झाले.ते नदीवर जावून एकटेच विचार करत बसले.घरी आल्यावर त्यांनी गोविंदरावांना विचारले असे का?त्यावर गोविंदराव म्हणाले”उपकार मान आज जर पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाखाली दिले असते.” या अपमानाने त्यांच्या अंगात अंगार फुलला मग त्यांनी विषमते विरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. हिंदू समाजातील मतलबी रुढीचा त्यांना तिरस्कार वाटू लागला. ज्योतीबांनी शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण करतानाच लहूजी वस्तादांकडून शारीरिक व्यायामाचे प्रकार आणि काही शास्त्रांचे ज्ञान संपादन केले होते. त्यातही त्यांनी कीर्ती संपादन केली.१८४७ पर्यंत जोतिबा बुद्धीने चांगले प्रौढ झाले होते. त्यांनी समाजाचे बार्काईने निरीक्षण केले.त्यातून त्यांच्या असे लक्षात आले की आपला हिंदू समाज जाती भेदाने आणि विशिष्ट वर्गाच्या गुलामगिरीत राहून प्रतिगामी बनला आहे. स्त्रिया आणि शुद्र यांची कुचंबना होत आहे.हे सर्व स्त्रिया आणि बहुजन समाज शिक्षणा पासून दूर राहिल्यामुळे घडत आहे. हे सर्व त्यांच्या निदर्शनाला आल. त्यावरून त्यांनी भावी जीवनातील कार्याची दिशा ठरविली. ते सरकारी नौकरीच्या मागे न लागता समाज कार्य करायचे ठरवून कामाला लागले. सामाजिक गुलामगिरी दूर करणे आणि सर्वांनला शिक्षणाची दारे खुली करणे यासाठी प्रयत्नशील राहणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरले.जोतिबा फुले यांनी पुण्यात भिडेवाडयात ‘ मुलींची शाळा ‘ काढुन एकच खळबळ निर्माण केली. त्यांचे हे कार्य तत्कालीन रूढीप्रिय समाजाला रुचले नाही.मुलींची शाळा काढण्यासाठी पूर्व तयारी म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला प्रथम शिक्षण दिले. सावित्रीबाईनींही आपल्या पतीच्या जीवन कार्याला मनापासून सहाय्य केले. १८४८ मध्ये पहिली १८५१ मध्ये दुसरी आणि १८५२ मध्ये तिसरी मुलींची शाळा काढली. या शाळा व्यवस्थित चालू लागल्या. मेजर कॕन्डी यांनी सरकार तर्फे ७५ रु अनुदान मंजूर केले. फुले यांच्या या महान सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला.या सत्काराने पुण्यातील सनातनी ब्राम्हणांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पेशव्यांच्या राजधानीत एका शुद्राचा सार्वजनिक सत्कार व तोही शाल देऊन. हे त्यांना अजिबात रुचले नाही. कारण पेशवाईत केवळ ब्राह्मण पंडितांचाच शाल देऊन सत्कार केला जात असे. यानंतर जोतिबांनी सामाजिक सुधारनांकडे विशेष लक्ष द्यायचे ठरविले.व्यक्ती स्वातंत्र्य, समता, आणि बुद्धीप्रामान्य यासाठी ते झगडू लागले. सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, भ्रुणहत्या ,या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला, केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेउन ‘ बालहत्या प्रतिबंधगृह ‘ ही संस्था सुरु केली. समाजात स्पृश्य -अस्पृश्य असा भेदाभेद पाळनारांचा रोश पत्करून त्यांनी आपल्या घराजवळचा पाण्याचा हौद सर्वांना म्हणजे अस्पृश्यांनाही खुला केला.शेतकऱ्यांचा मोठा वर्ग वर्षानुवर्ष अज्ञान, गुलागिरी याने त्रस्त झालेल्या होता . हा वर्ग असंघटीत होता म्हणून त्यांचे हाल होतात हे ओळखून ज्योतिबायांनी कार्य केले . त्यातूनच ‘सत्यशोधक समाज’ स्थापन झाला . अज्ञान हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे अशी त्याची समजूत असल्याने त्यांनी शिक्षणाचे मह्त्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सामजिक प्रश्नांवर जे चिंतन केले होते . त्यावर लेखनही केले. ‘शेतकऱ्याचा आसूड’ ‘ब्राम्हणाचे कसब’, ‘ गुलामगिरी’ ‘तृतीय रत्न(नाटक)’, ‘शिवाजीचा पोवाडा’, तसेच सार्वजनिक सत्यधर्म’, असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी ‘अखंड ‘ नाव देऊन काही अभंगांचेही लेखन केले. मूलगामी आणि तर्कशुद्ध अशा त्यांच्या चिंतनातून पुढील ओळी निर्माण झाल्या. ‘गुलामगिरी’ मधील त्या ओळी अशा आहेत – *विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नितीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविनाशुद्र खचले । इतका अनर्थ एका अविद्येने केले * ।।। शिक्षण हेच समाज – मानस परिवर्तनाचे प्रभावी मध्यम आहे, हे लक्षात येताच अस्पृश्यासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा काढल्या , अनाथाश्रम काढले ,वृत्तपत्रे काढलीत ,धर्म जन्माने न मिळता माणसाने स्व:त च्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे. शेतकर्यानच्या व्यथा इंग्रज प्रश्यासनाच्या कानी पोहचविल्या,शेतकरी हा समाजाचा कणा आहे. पोशिंदा, अन्नदाता आहे, असे मत त्यांनी मांडले.आणि जनजागृती केली. त्यांच्या साठाव्या वर्षी जनतेने मुंबईस त्यांचा सत्कार करून त्याना ‘ महात्मा ‘ हि पदवी बहाल केली. ६३ वर्षे ते चंदना सारखे झिजले. प्रवास केला, व्याख्याने दिली, लेख लिहिले,स्वातंत्र्य , समता, लोकशाही, विज्ञान, इह्वाद, या आधुनिक मुल्यांवर भर देवून सामाजिक क्रांतीची पेरणी केली. डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले. सहज सोप्या भाषेत नेमकी स्पष्टता आणने त्यांना जमत असे. विचारांना कृतीशिलतेची जोड दिली. ‘ जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे’ मग महंत लीला स्वभावे, अंगी बाणे’. या वचनांची सार्थकता सिद्ध करणारा हा महात्मा सर्व सुखांचे आगर, नीती तत्वांचे माहेर, असा हा महात्मा अविरत कष्टाने २८ नोहेंबर १८९० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना कोटी कोटी प्रणाम ! *लेखक:शंकर नामदेव गच्चे नांदेड प्रा.शा.वायवाडी मोबाईल नंबर -8275390410
