
नांदगाव (विशेष प्रतिनिधी,) : – भारताची आगामी जनगणना २०२३ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गणना मोहिमेला आजपासून (दि. २) सुरुवात झाली असून, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. या प्रक्रियेची सुरुवात ‘स्वगणना’ सुविधेपासून होत असल्याची माहिती तहसीलदार सुनील सांदों यांनी दिली आहे.स्वगणना अंतर्गत नागरिकांनी स्वतःच आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरायची असून, ही प्रक्रिया सुमारे १० ते १५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. संबंधित माहिती मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून भरता येईल. माहिती सबमिट केल्यानंतर नागरिकांना एक स्वगणना क्रमांक प्राप्त होईल. हा क्रमांक जतन करून ठेवणे आवश्यक असून, १६ मे ते १४ जून दरम्यान प्रत्यक्ष गणनेसाठी येणाऱ्या प्रगणकास हा क्रमांक दाखवणे बंधनकारक राहणार आहे.तहसीलदारांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त लोकांनी स्वगणना सुविधेचा लाभ घ्यावा व अचूक माहिती देऊन शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहकार्य करावे. अचूक माहिती दिल्यास गणनेची प्रक्रिया सुलभ व जलद होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या मोहिमेसाठी नांदगाव तालुक्यात सुमारे ३९८ प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, महाराष्ट्र स्थापना दिन (१ मे) पासून नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या उपक्रमासाठी तहसील कार्यालयातील विविध अधिकारी व कर्मचारी नागरिकांना सहकार्य करत असून, सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
