
जळगाव निंबायती (वार्ताहर) शासनाची सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या अभिनव व प्रभावी उपक्रमांतर्गत नागरिकांच्या महसूल विषयक समस्या, अडचणी व प्रलंबित कामांचे जलद आणि पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सेनेचे बाळासाहेब कांदे होते. प्रमुख अतिथी म्हणून मालेगाव उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर होते.

समवेत निवासी नायब तहसीलदार युवराज परचुरे, उपसरपंच महेंद्र पाटील, सौंदाणे मंडळ कृषी अधिकारी कुमारी शुभांगी सानप, एस. बी. देशमुख, श्रीमती स्मिता महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गांगुर्डे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आशा सावंत, आशा पर्यवेक्षिका श्रीमती प्रतिभा बच्छाव, आरोग्य सेविका श्रीमती एस. आर. बागूल, ग्रामविकास अधिकारी हेमंत शिरसाठ, महिला बचतगट अधिकारी, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य पी. जी. माने, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सरपंच वाल्ह्याबाई पटांग्रे, पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी शेतकरी, शेतमजूर, महिला ग्रामस्थ, तरुण युवक बहुसंख्येने उपस्थित होते.

ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी तालुका कार्यालयात वारंवार जावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचावेत, या उद्देशाने मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा बळकट करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, तळागाळातील घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा मुख्य हेतू असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी सदगीर यांनी केले.

प्रसंगी निवासी दाखले, जात प्रमाणपत्रे, शिधापत्रिका, सातबारा उतारे, नाव नोंदणी आदी योजनांचे प्रमाणपत्र लाभार्थींना देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. अमोल अहिरे यांनी केले तर आभार नरेंद्र अहिरे यांनी मानलेत.
