
नाशिक:-( प्रतिनिधी )परिस्थितीचे चटके मूकपणे सोसल्याशिवाय यशाचा मार्ग सापडत नाही. मात्र वाट्याला आलेले गरिबीचे चटके अधिक वेदनादायी असतात, असे प्रतिपादन प्रा.एन.डी.कांबळे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ते ‘तळमळ’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य के.मा.मोरे होते. प्रा.कांबळे पुढे म्हणाले की, सामान्य माणसाला अस्वस्थ करणाऱ्या कष्टमय जीवनाची व्याख्या करणे खूप अवघड आहे. त्यामुळे मनातील तळमळ ही माणसाला नेहमीच नवी दिशा देत असते. आज परिस्थिती बदलली असली तरी अस्पृश्यता, गरिबी, दारिद्र्य, दुष्काळ अशा विविध अडचणींवर मात करत सामान्य माणूस जेव्हा यशस्वी होतो; तेव्हा त्याचा भूतकाळ हा त्याला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही, असे सांगून पुस्तकातील काही कविता सादर केल्या. रजनी वाणी आणि सुशीला पिंपरीकर यांना ग्रंथभेट देण्यात आली. योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार मानले. राजेंद्र देसले यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (५) ‘हळवे अंतर’ या पुस्तकावर विजया कांडेकर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
