
लासलगाव, ता. १४ (.प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने १४ जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भूगोलशास्त्र विषयाचे महत्त्व व त्यातील करिअरच्या संधी याबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.आदिनाथ मोरे होते तर प्रमुख वक्ते म्हणून नाशिक येथील के.व्ही.एन.नाईक महाविद्यालयाचे प्रा.डॉ.बाळासाहेब चकोर होते. त्यांनी भूगोल विषयातील करिअरच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. भूगोल विषय हा केवळ नकाशे, नद्या व पर्वत इ. चा अभ्यास नसून मानव, पर्यावरण, संसाधने, तंत्रज्ञान यांचा एकत्रित अभ्यास करणारे आधुनिक अंतरविद्याशाखीय शास्त्र आहे. भूगोलशास्त्रातून विद्यार्थ्यांसाठी उज्वल करिअरच्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आधुनिक बदलत्या युगाशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भूगोल दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत भौगोलिक विषयावर विविध पोस्टर्स तयार केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी शेळके हिने केले, प्रास्ताविक प्रा.डॉ.सोमनाथ आरोटे यांनी केले तर आभार गायत्री पोटे हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूगोल विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.हर्षद कदम व प्रा.परसराम पानसरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
