
काकासाहेब नगर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्योजक दीपक घंगाळे
काकासाहेबनगर (प्रतिनिधी) नव्या तंत्रज्ञानाला न बिचकता सामोरे गेल्याशिवाय आपली प्रगती शक्य नाही. आपल्याला आपले निश्चित केलेले ध्येय गाठायचे असेल तर आपण नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेतलेच पाहिजे. त्यासाठी चिकाटी आणि परिश्रम करण्याची आपली तयारी असली तर आपल्या ध्येयपूर्तीपासून आपल्याला कुणीच हटवू शकत नाही. ग्रामीण भागातील तरूण आपल्या मनात नाहक न्यूनगंड बाळगत असतो. उलट त्याच्यात प्रतिकूल परिस्थितीशी झटण्याचे सामर्थ्य असते फक्त गरज आहे ते सामर्थ्य ओळ्खण्याचे. असे प्रतिपादन उद्योजक आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दीपक घंगाळे यांनी केले.
के के वाघ महाविद्यालय काकासाहेबनगर येथे ‘स्नेहगंध’ या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून घंगाळे बोलत होते. त्यांनी माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आठवणीना उजाळा देत, आपल्यातल्या उद्योजकाच्या यशाची कहाणी कथन केली.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, आशिष लहारे, प्रियांका जाधव, गायत्री माळी, निकिता जाधव, शुभम शिंदे, तेजस घोलप, कावेरी जाधव, नवनाथ पगार, ऋतुजा आहेर, तेजस गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य बाळासाहेब वाघ होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माजी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. वैशाली शिंदे यांनी करून दिली. सूत्रसंचलन प्रा. नीलेश आहेर तर आभार डॉ. अरुण ठोके यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे विकास समिती सदस्य रामनाथ पानगव्हाणे, माजी विद्यार्थी मेळावा अध्यक्ष वैभव नंदकुमार कुशारे माजी विद्यार्थी मेळावा समन्वयक प्रा. अर्चना ताकाटे, प्रा. किरण वाघ, माजी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते.
