
मालेगाव (वार्ताहर) – आपल्या जिवनाचे उद्दीष्ट आपल्याला कळले पाहिजे. ते कळण्यासाठी स्वत:ची ओळख झाली पाहिजे. ज्याने स्वत:ला ओळखले, त्याने परमात्म्याला ओळखले. युवकांनो उठा, जागे व्हा अन् ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका! ध्येय निश्चितीचा मूलमंत्र स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिला असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे माजी नगरप्रमुख प्रा. अमोल अहिरे यांनी केले ते सौंदाणे येथील महात्मा गांधी विद्यामंदिरच्या जनता विद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य रविंद्र बाचकर होते. समवेत सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलतांना अहिरे म्हणालेत एकाग्रता ही ज्ञानसाधनेची गुरुकिल्ली आहे. एकाग्रता जेवढी अधिक तेवढे ज्ञानसंपादन अधिक होईल. ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्रतेबरोबरच श्रद्धाही आवश्यक आहे. श्रद्धा हेच विकासाचे मूळ आहे. कॉन्सन्ट्रेशन (एकाग्रता), कॉन्फिडन्स (आत्मविश्वास) व कॉम्पिटिशन (स्पर्धा) विवेकानंदांच्या जीवनातील या ‘ट्रिपल सी’चे सूत्र युवकांनी अंगिकारावे असे आवाहन प्रा. अहिरे यांनी केले. प्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थींनी अरुंधती पाटील व साक्षी पवार यांनी जिजाऊंची साकारलेली वेशभूषा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. प्रास्ताविक उपप्राचार्य जे. एस. बच्छाव यांनी केले, परिचय व सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार ज्यु. काॅलेज विभाग प्रमुख जाधव यांनी मानलेत.
