
जळगाव निंबायती (वार्ताहर) नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे नाशिक येथे विविध वयोगटांसाठी जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा व निवडचाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी परिसरात उत्साहात पार पडल्या. पुरुष व महिला खुला गट तसेच २०, १८ व १६ वर्षांखालील मुले-मुली अशा विविध वयोगटांत स्पर्धा घेण्यात आल्यात. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी साईराम सूर्यभान ढोणे याने उत्कृष्ट कामगिरी करत ६ मिनिटे ४८ सेकंदांत क्रॉस कंट्री शर्यत पूर्ण करून विजेतेपद पटकावले.
सदर स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विविध गटांतील खेळाडूंची नाशिक जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. निवड झालेले खेळाडू १० जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री स्पर्धा व निवडचाचणीत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे व सचिव सुनील ताबरगिरी यांनी दिली आहे. साईराजला क्रीडा शिक्षक ललित निकम यांनी मार्गदर्शन केले. साईराजचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह विद्यार्थी व ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतले आहे.
