
नांदगाव (प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या राष्ट्रीय सेवा योजना+2 स्तरचे ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराची’ सांगता उत्साहात झाली. समारोप समारंभासाठी मंचावर म.वि.प्र.समाज संस्थेचे सभासद जगन्नाथराव चोळके,सुदामराव काळे, दत्तू पाटील काकळीज, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड, कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.जी.व्ही.बोरसे उपस्थित होते

. प्रास्ताविकातुन कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी मान्यवरांना सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान,वैचारिक प्रबोधनासाठी आयोजित झालेली व्याख्याने,विद्यार्थी आरोग्य तपासणी,सांस्कृतिक कार्यक्रम व शिबिर कालावधीत संपन्न झालेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे यांनी आपल्या मनोगतातून शिबिर कालावधीत प्राप्त केलेल्या श्रमसंस्कारांमुळे व्यक्तिमत्व विकसित होते व पर्यायाने आदर्श नागरिक बनण्यास अभिप्रेत असणाऱ्या वैशिष्ट्यांमध्ये गुणात्मक वाढ होत असल्याचे सांगितले. शिबिरात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी शिबिर कालावधीत आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये कृतीयुक्त सहभाग घेतल्यामुळे त्यांनी सर्वांचे कौतुक केले. समाजात वावरतानाही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा व आपली सामाजिक जबाबदारी व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचे याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे महत्व विशद करताना या शिबिरातून विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन श्रमाचे संस्कार प्राप्त करून घेतल्याने शिबिरार्थी स्वयंसेवकांचे कौतुक केले.अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे सामाजिक भान निर्माण होते व नेतृत्व गुण विकसित होत असल्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक भविष्यात सामाजिक नेतृत्व करण्यात अग्रणी राहतात व त्यांच्याकडे सोपविलेली सामाजिक जबाबदारी ते कौशल्यपूर्णतेने पार पाडण्यात सक्षम होत असल्याचे सांगितले.

म.वि.प्र.समाज संचालक मा. इंजि.अमितभाऊ बोरसे पाटील यांनी शुभ संदेशातून शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी अश्विनी टिळेकर, काजल टिळेकर, कीर्ती देवकर, साक्षी सौंदाणे, वैष्णवी गांगुर्डे,अंकुश देवकाते, यश औशीकर,लायबा शेख, विशाखा शिरसाठ,अस्मिता जाधव इ. शिबिरार्थी स्वयंसेवकांनी गीत, कविता गायन करून मान्यवरांना मंत्रमुक्त केले व शिबिरात आलेले अनुभव व यामुळे मिळालेल्या संस्कारांची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +2स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.जी.व्ही.बोरसे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी शिबिरार्थी स्वयंसेवक, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना+2 स्तरचे सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. सी. पैठणकर व प्रा.श्रीमती टी.एन.आहेर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम संपल्यानंतर मान्यवर व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
