
नाशिक:( प्रतिनिधी )’साहित्यकणा फाउंडेशन’च्या वतीने १ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक आणि भाषाभ्यासक डॉ. पृथ्वीराज तौर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय गोराडे यांनी दिली.
डॉ. तौर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख असून, ३० पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांना रशियातील मॉस्को येथे ‘सिल्व्हर मेडल’ने सन्मानित करण्यात आले असून, इजिप्त, चीन आणि तुर्की येथील जागतिक साहित्य महोत्सवात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीवरही त्यांचे कार्य मोलाचे आहे.
अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या उपस्थितीत होणारे हे संमेलन समर्थ मंगल कार्यालय, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव विलास पंचभाई यांनी दिली. या सोहळ्याला नाशिकमधील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
