
नाशिक( प्रतिनिधी) दिनांक १५ जानेवारी :- नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनच्या वतीने दर वर्षीप्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र क्रीडा दिनाचा निमित्ताने नाशिकच्या विविध खेळातील जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू, आणि संघटक यांना सन्मान सोहळ्याचे आयोजन उद्या दिनांक १७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. भारताचे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी स्वतंत्र भारताला ऑलीम्पिकमध्ये पहिले ऑलीम्पिक कास्य पदक मिळवून दिले. त्यांची जयंती १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. परंतु आज दिनांक १५ जानेवारी रोजी महानगर पालिकांची निवडणूक असल्यामुळे हा सन्मान सोहळा उद्या दिनांक १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. उद्या दिनांक १७ रोजी दुपारी ३.३० वाजता गोखले शिक्षण संस्थेच्या बी. वय. के. कॉलेजच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकचे जेष्ठ क्रीडापटू आणि प्रशिक्षक भोसला सैनिकी संस्थेचे माजी शिक्षक मोहन चेंगेडिया यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल “जीवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक खेळातील नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात ज्या ज्या खेळाडू आणि संघटक यांनी मोलाचे योगदान दिले आहे अश्या जेष्ठ खेळाडू आणि संघटकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये अँथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, रोईंग, कायाकिंग- कैनोइंग, बॉडी बिल्डिंग, मल्लखांब, रोप मल्लखांब, जिम्नॅस्टिकस, ज्युदो, तलवारबाजी, आर्चरी, क्रिकेट, हॅण्डबॉल, बॉल- बॅडमिंटन, नेटबॉल, चॉकबॉल, कार्फबॉल, डॉजबॉल, स्केटिंग, नेटबॉल कार्फबोल, आट्या-पाट्या, सेपक टकरा, स्विमिग, बास्केटबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, सायकलिंग, सायकल पोलो, लॉन टेनिस, ब्रीज, बुद्धिबळ, कॅरम, शुटटींग बोल, टेनीक्वाइट, मोटो – क्रॉस, बिलीर्डर्स – स्नूकर, योगा, टेनिस क्रिकेट अश्या सर्वच खेळांचा समावेश आहे. अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंगआणि खजिनदार हेमंत पांडे यांनी दिली. या कार्यक्रमाला खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित खाशाबा जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी नाशिकच्या क्रीडा प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या जेष्ठ खेळाडू आणि संघटकांच्या सन्मान सोहळा यशस्वी करावा असे अवाहन आयोजकांनी केले आहे.
