
जल्लोष करताना नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाचे सदस्य.
मनमाड, ता. २६ — अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ – राज्यस्तरीय पुरस्कार यंदा नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघाला जाहीर झाला आहे.
पत्रकार संघाचे संस्थापक अमोल खरे यांनी तालुक्यातील पत्रकारांचे संघटन करून केलेल्या भरीव कार्याचा हा गौरव असल्याचे मत संघातील ज्येष्ठ पत्रकार, पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केले. उत्कृष्ट संघटनात्मक कामगिरी, सामाजिक बांधिलकी, पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने केलेले प्रयत्न तसेच लोकहितवादी पत्रकारितेचा वारसा जपणाऱ्या संघाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, शरद पाबळे, शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, मन्सूर शेख, अनिल वाघमारे, शोभा जयपूरकर आणि संदीप कुलकर्णी यांनी केली.
यंदा परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ यांना आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार, तर नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप असून कर्जत येथे होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाने पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने ठाम भूमिका घेतली असून विविध सामाजिक, शैक्षणिक व लोकजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवले आहेत. स्थानिक पातळीवर पत्रकारांमध्ये एकोपा निर्माण करताना संघटनात्मक शिस्त, प्रशिक्षण व मार्गदर्शन यावर विशेष भर देण्यात आला आहे. याच कार्याची दखल घेऊन संघाचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार जाहीर होताच तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा सन्मान सर्व सदस्यांच्या एकत्रित परिश्रमांचे फलित असल्याचे सांगत, भविष्यात अधिक जबाबदारीने व निर्भीड पत्रकारिता करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
