
नांदगाव( प्रतिनिधी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात’ शिबिरार्थी स्वयंसेवकांची आरोग्य तपासणी संपन्न झाली. नांदगाव ग्रामीण रुग्णालयाच्या पथकातील डॉ.गरुड, तंत्रज्ञ राम काळे व सहाय्यक राहुल सर यांनी 80 शिबिरार्थी स्वयंसेवकांच्या विविध रक्त चाचण्या आरोग्य तपासणी शिबिरात केल्या. सदर प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.अजय पानसरे यांनी ‘उत्तम आरोग्यासाठी चांगल्या सवयी’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आपले आरोग्य निरामय, सुदृढ व ताणतणावरहीत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग व प्राणायाम करण्याचा सल्ला दिला. मैदानी खेळांमध्ये सहभाग घेतल्याने शारीरिक हालचाली जलद गतीने होत असल्याने स्नायू पिळदार बनतात व शरीरयष्टी सुडौल होण्यास मदत होत असल्याचे सांगून शिबिरार्थी स्वयंसेवकांना मैदानी खेळांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

आरोग्य तपासणी संपन्न झाल्यानंतर शिबीरार्थी स्वयंसेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात शिबिरार्थी स्वयंसेवकांनी हिरीरीने सहभाग घेऊन कथा, गोष्टी, शब्दकोडे, सामान्य ज्ञानावरचे प्रश्न, गायन, कविता वाचन केले. महाविद्यालयाचे प्रा.अजय पानसरे व प्रा.आर.डी. पाटील यांनी आपल्या सुरेल आवाजात गीत व कवितांचे गायन करून शिबिरार्थीं स्वयंसेवकांचे मनोरंजन केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याने आपले व्यक्तिमत्व विकसित होत असल्याचे सांगून अन्य बाबींवर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के. पवार यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.सी. पैठणकर, प्रा.श्रीमती टी.एन.आहेर व शुभम आहेर यांनी परिश्रम घेतले.
