
(डोंबिवली विशेष प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले.

नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ, लोक नृत्य आदी. वर मार्गदर्शन केले. शिबिरार्थी कडून इम्प्रोवायजेशन करून घेतले. संगीत, प्रकाशयोजना, मानवी नेपथ्य, लोकनृत्य, तसेच काही व्यायाम करून घेतले काही नाट्यछटा त्यांच्याकडून बसवून घेतल्या.
अभिनेते व दिग्दर्शक राम दौड यांनी अभिनय व रंगभूमीचा उदय आणि विकास यावर मार्गदर्शन केले. राम दौंड सरांनी अभिनयातील बारकावे कृतीतून समजावून दिले त्यासाठी कलाकारांना विषय देऊन त्यांच्याकडून छोटे छोटे नाट्य प्रवेश बसवून घेतले. हॉल मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा उपयोग करून फुल बनवायला सांगण्यात आले त्यासाठी कलाकारांना पाच मिनिटाचा वेळ देण्यात आला. त्यांची क्रियेटिव्हिटी त्या द्वारे पाहण्यात आली. व्यक्ती रेखा, नाट्य आशय विषय या कडे सूक्ष्म आणि गंभीर पणे पाहणे आवश्यक आहे असे अधोरेखित केले गेले. कलाकारांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली गेली
जेष्ठ नाट्य दिग्दर्शक रविंद लाखे यांनी दिग्दर्शन एक आव्हान याविषयावर मार्गदर्शन केले. नाटकाने पारंपारिक संकेत झुगारून देऊन नाटक खूप पुढे गेले आहे. आमुक ठिकाणी आमुक आशयचा प्रसंग घडवावा असे नाट्य शास्त्रात म्हटले असले तरी हल्लीच्या नाटकात ते संकेत पाळले जातातच असे नाही. नाटक समजून घेण्यासाठी ते पुन्हा पुन्हा वाचायला पाहिजे. नाटकाची प्रत्येक तालीम हा नाट्य प्रयोगच असतो. कलाकाराने व्यक्तीरेखा समजून घेण्यासाठी त्या व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास केला पाहिजे. अशा अनेक बाबी कलाकारांना समजावून सांगितल्या. त्यांनी असे ही सांगितले की नाटक केवळ एक रेषीय नसते तर त्याला अनेक कांगोरे असतात.

डॉ. गणेश चंदनशिवे यांनी लोककला याविषयी सहभागी कलाकारांना मार्गदर्शन केले. डॉ. गणेश चंदनशिवे , विभागप्रमुख, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांनी महाराष्ट्रातील लोककलेची मांडणी केली. त्यांनी केवळ कलेवर भाष्य केले असे नव्हेतर आपल्या पहाडी, टिपेला पोहचणाऱ्या सुमधुर आवाजात भारूड , भजन, गवळण, गोंधळ, जागरण, लावणी, अशी विविध लोक गीते सादर केली. उपस्थित सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. वारकरी संप्रदाय ते आंबेडकरी जलसे, कव्वाली इथपर्यंत त्यांनी लोककलेचा आढावा घेतला. महाराष्ट्रात होऊन गेलेले शाहीर, संत, त्यांच्या ओव्या, कवणे , त्यांचे विचार यावर त्यांनी भाष्य केले, ती गाण्यांच्या माध्यमातून सादर केली. लोककलेवर त्यांचा संशोधनात्मक अभ्यास आहे शिवाय त्यावर त्यांची हुकमत ही आहे. त्यांच्या अडीच तासाच्या श्रावणीय व्याख्यान – गायनातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती त्यांनी डोळ्यासमोर उभी केली.

या कार्यशाळेत कोणतीही औपचारिकता न राहता एक कौटुंबिक कार्यक्रमाचे स्वरूप त्यास प्राप्त झाले होते. सहभागी सर्व कलाकारांनी आयोजकांचे आभार व्यक्त करून अश्या कार्यशाळेचे पुन्हा आयोजन व्हावे अशी मागणी केली.
या कार्यशाळेचे आयोजक डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ व सुत्रधार अशोक हंडोरे यांनी सर्व सहभागी कलाकारांना संस्थे मार्फत प्रामाणपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व कार्यशाळेचा समारोप केला.
