
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) परधाडी तालुका नांदगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेसाठी कमी असलेले शिक्षक त्वरीत दिले नाही तर येत्या २८ ऑगस्ट रोजी गावकऱ्यांच्या वतीने शाळेस कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा परधाडी ग्रामस्थांच्या वतीने नांदगाव पंचायत समिती प्रशासनास लेखी स्वरूपात देण्यात आला आहे .२१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये तश्या आशयाच्या ठराव क्रमांक आठ सर्वानुमते संमत करण्यात आला व त्यानुसार सदरचा इशारा देण्यात आला आहे . सदरच्या ठरावावर सुचक म्हणुन रामदास अण्णासाहेब पवार तर अनुमोदक म्हणून मनोहर रतन पवार हे असुन गेल्या अनेक दिवसांपासून शाळा व्यवस्थापन समितीकडून लेखी व तोंडी शिक्षक देण्यासंदर्भात मागणी करीत असतानाही गटशिक्षण अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर सर्वांनुमते शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक ते सात वर्ग असून त्यात एक मुख्याध्यापक एक उपशिक्षक दोन पदवीधर शिक्षक अशी एकूण चार जागा रिक्त आहेत शाळेची आजची पटसंख्या 243 इतकी असतानाही विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने अखेर आम्हास टाळा ठोकण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे अशी माहिती पालकांनी दिली असून याबाबत या अगोदर १७ एप्रिल रोजीच शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सर्व परिस्थिती लेखी स्वरूपात मांडून शिक्षक देण्याविषयी विनंती केलेली होती परंतु चार महिन्यांचा कालावधी संपूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे शेवटी संतप्त झालेले पालक आक्रमक होऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे तशा आशाचा ठराव ग्रामसभेत करण्यात येऊन त्याच्या प्रति संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष आता २८ ऑगस्ट कडे लागले आहे.
