
सोनांबे बातमीदार :सिन्नर तालुक्यातील डुबेरेवाडी येथे काल शुक्रवार (ता.२२) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागून गावाच्या मध्यवस्तीतील दीडशे वर्षे जुनी दुमजली लाकडी इमारत जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.भास्कर लक्ष्मण सदगीर यांच्या मालकीची ही जुनी इमारत भाडेकरूंना दिली होती. प्राथमिक माहितीनुसार, सौ. अरुणा कारभारी गोफणे यांच्या घरातील गॅस टाकीच्या नळीतून झालेल्या गळतीमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.या आगीत गणेश रघुनाथ गोफणे यांचे धान्याची २० पोती, संसारोपयोगी भांडी, कपडे, रोख ३५ हजार रुपये व अडीच ते तीन लाख रुपयांचे दागिने भस्मसात झाले.

तर सचिन अजिनाथ धोत्रे यांचे साधारण अडीच लाख रुपये किमतीचे डीजे साहित्य जळून खाक झाले.घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र लाकडी घरातील फर्निचर, कपडे व साहित्यामुळे आगीने क्षणात भीषण रूप धारण केले. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती नियंत्रणाबाहेर गेल्याने सरपंच दत्तू गोफणे यांनी तातडीने अग्निशामक दल व पोलिसांना कळवले.सिन्नर नगरपालिका व एमआयडीसीचे दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले

.गावाच्या मध्यवस्तीतील या दुर्घटनेने ग्रामस्थ हादरले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र जीवितहानी टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
