
“उन्हाळ्यात हवी असेल सावली, तर वृक्ष लावा पावलोपावली”
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीने सातपूर येथील NAB (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) वर्कशॉपमध्ये वृक्षपूजन व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न झाला.
चार वर्षांपूर्वी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे वृक्षारोपण केले होते. त्या वृक्षाचे जतन व संगोपन करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. अनिल भालेराव यांनी चार वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षाचे पूजन करताना, “उन्हाळ्यात हवी असेल सावली, तर वृक्ष लावा पावलोपावली,” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारण्याची गरज व्यक्त केली. वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे पदाधिकारी अजय देव, प्रतिभा कोतकर, संध्या कुवर, अनिता भंडारकर, पंढरीनाथ कोतकर तसेच NAB संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
