
सोनांबे ( प्रतिनिधी) : आटकवडे (ता.सिन्नर) येथे खऱ्या अर्थाने संस्कारांचा दीप प्रज्वलित करणारा एक आगळावेगळा उपक्रम रंगला. बडौदा (गुजरात) येथे कार्यरत असलेले नामांकित इंजिनिअर गणपत कोंडाजी वाघ, जे आटकवडे जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी आपली चिमुरडी ग्रीष्मा या मुलीचा वाढदिवस हा ऐसपैस हॉटेलात किंवा गजबजलेल्या बागेत न साजरा करता — थेट आपल्या मातृसंस्था असलेल्या शाळेत साजरा केला. लाडकी ग्रीष्मा गणपत वाघ हिचा वाढदिवस शाळेच्या कोंदणात साजरा होताच वातावरण आनंद, उत्साह व संस्कारमूल्यांनी दरवळून गेले.

विद्यार्थ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी आणि ग्रीष्मासाठी उमटलेल्या शुभेच्छांनी शाळेच्या सभागृहात एक अविस्मरणीय क्षण घडून आला. या प्रसंगी ग्रीष्माला शाळेच्या वतीने वाढदिवसाच्या मंगलकामना देण्यात आल्या. शालेय मित्रपरिवारासोबत खाऊ व मिष्टान्न वाटप करून लहानग्यांच्या आनंदात भर टाकण्यात आली.मुख्यमंत्री युवा शिक्षिका प्रियंका फड, ग्रीष्माचे वडील गणपत कोंडाजी वाघ, आई सौ.मोहिनी वाघ, आजी सुमनबाई वाघ,आजोबा कोंडाजी मुरलीधर वाघ, काका वैभव सुभाष वाघ आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. छाया शेवाळे यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करून वाघ कुटुंबाचे आभार मानले. “आपण शिकलेल्या शाळेचे ऋण अशा सुंदर कृतीतून फेडणे, ही खऱ्या अर्थाने नवीन पिढीसमोर ठेवलेली प्रेरणादायी शिकवण आहे,” असे त्या यावेळी म्हणाल्या. अशा या अनोख्या वाढदिवस सोहळ्याने ग्रीष्मा वाघ हिच्या बालपणाला एक वेगळीच ओळख मिळाली. शाळा व समाज यांच्या सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे केंद्रप्रमुख विजय निरगुडे यांनी कौतुक केले आहे.
