
नाशिक ( प्रतिनिधी):- प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अडचणीचे खाजखळगे असतातच. त्यावर मात करताना जिद्द आणि चिकाटीने परिश्रमपूर्वक प्रयत्न केल्यास यशप्राप्ती निश्चित होते, असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक अशोक कुमावत यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात १७५वे पुष्प गुंफताना ‘उठा तुम्ही जिकंणारच!’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा मारताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री सुनंदा पाटील होत्या. अशोक कुमावत पुढे म्हणाले की, येणाऱ्या संकटांतून त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. वेदना असह्य झाल्या तरी दु:ख कुरवाळत बसू नये. लढत राहाणे हा आपला स्थायिभाव असला पाहिजे. आयुष्यात दु:खाचा बाजार न मांडता हसत-हसत आनंदाने अडचणींचा सामना करता आला पाहिजे. परिस्थितीवर मात करून प्रेरणेची ज्योत पेटवता आली पाहिजे. अशाच जिद्दी व्यक्तिमत्त्वांची यशोगाथा या पुस्तकात आहे. त्यामुळे निश्चितच नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले. प्रमोद ब्राह्मणकर आणि रवींद्र भामरे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर मधुकर गिरी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (२६) कवी अरुण घोडेराव ‘काफीरनामा’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
