
भालूर ( वार्ताहर)येथे बळीराजाला वर्षभर शेतीत मदत करणाऱ्या बैलांचा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बैल म्हणजे शेतकऱ्याच्या बरोबरीने शेतात काबाडकष्ट करणारा आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीत मोलाचे योगदान असलेला हा शेतकऱ्यांचा मित्र. या मित्रा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा.यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकरी समाधानी असल्यामुळे बैलपोळा आनंदात साजरा करण्यात आला.बैलांना अंघोळ घालून त्यांची सजावट करण्यात आली.सायंकाळी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले.बैलांवर टाकलेली सैराट,परश्या,आर्ची,शिवराय आदी नावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.तर काहींनी विठूरायाची मूर्ती बैलांवर साकारल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

डिजिटल तंत्रज्ञानात जरी क्रांती घडून आली तरी ग्रामीण भागात मात्र बैलपोळ्याचा उत्साह तरुणाई मध्ये ओसंडून वाहत होता.सायंकाळी पाच नंतर गावातील वेशीतआगमन झाल्यानंतर तुतारीच्या जयघोषात गावातून मारुती मंदिरासमोरून बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी देविदास निकम,विजय बरशिले,राजेश निकम,वसंत निकम,शिवाजी निकम,भाऊसाहेब सोमासे,सुनील आहेर,भागीनाथ आरसुळे,निशिकांत आहेर,गोरख निकम आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
