
नाशिक ( प्रतिनिधी ). महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीमध्ये रुजवण्यासाठी त्यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त नाशिक मधील अंनिसचे कार्यकर्ते तसेच समविचारी पक्ष, संस्था, संघटनांचे कार्यकर्ते व ,पदाधिकारी यांनी सकाळी साडेसात वाजता निर्भय मॉर्निंग वॉक चे आयोजन केले होते . मुंबई नाक्या जवळील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर यांना चळवळीच्या गीताच्या सामुदायिक गायनाने अभिवादन करून निर्भय मॉर्निंग वॉकची सुरुवात केली . सीबीएस जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथेही गुलाब पुष्प, चळवळीचे गीत व घोषणांनी अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मारकात समारोप करताना पुन्हा डॉ. दाभोलकर अमर रहे, डॉ. कलबुर्गी अमर रहे, कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, गौरी लंकेश अमर रहे अशा कृतज्ञता दर्शक घोषणा देण्यात आल्या. धर्मांधांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर ,कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्या घडवून आणल्या मात्र विचारवंतांनी समाजामध्ये जे कृतिशील विवेकी विचार पेरले ते मात्र हे धर्मांध, सनातनी विचारांचे लोक थांबवू शकत नाहीत. म्हणून कार्यकर्त्यांनी या विचारवंतांच्या विवेकी विचारांचा प्रचार, प्रसार करणे तसेच पुढील पिढीत हा विचार जाणिवपूर्वक रूजवून तो कृतिशील करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे असे अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.टि.आर. गोराणे यांनी आवाहन केले. यावेळी संघटितपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणे तसेच हे काम म्हणजे व्यापक समाज बदलाच्या प्रक्रियेची सुरुवात असून याद्वारे शोषणमुक्त, समताधिष्ठित ,विवेकी असा मानवतावादी समाज घडवणे होय,अशा संकल्पाचे सामूहिक वाचन करून क्रुतीशील होण्याचा निर्धार करण्यात आला.निर्भय मॉर्निंग वॉक या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड डॉ. डी एल कराड, कॉ. महादेव खुडे, संविधान प्रेमी नाशिककरचे अजमल खान आणि महाराष्ट्र अंनिसचे नाशिक मधील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते.
