
येवला ( प्रतिनिधी ) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा निघृण खून होऊन तब्बल बारा वर्ष एक तप लोटलं तरी त्यांचा खून करायला सांगणाऱ्या सूत्रधाराला अटक झालेली नाही ही अटक कधी करणार असा जाब विचारणारा मॉर्निंग वॉक आज सकाळी साडेसहा वाजता दाभोलकरांच्या शहिददिनी एवढ्यात संपन्न झाला.जो समाज अथवा देश चिकित्सा नाकारतो त्याची प्रगती खुंटत असते असे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे स्पष्ट मत होते.संपूर्ण समाज विवेकी सुखी समाधानी व्हावा त्या समाजाचे अंधश्रद्धांच्या नावाखाली कुणीही शोषण, लुटमार वा फसवणूक करू नये, म्हणून शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली होती.असा अत्यंत तर्कशुद्ध विचार करणाऱ्या विचारवंताचा वीस ऑगस्ट 2013 रोजी सकाळी ते मॉर्निंग वॉकला आलेले असतानाच निर्घृण खून करण्यात आला. त्या गोष्टीला तब्बल बारा वर्षे लोटले, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरोबरच महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांच्या रेट्यामुळे दोन-तीन बहुजन समाजातील सामान्य तरुणांना अटक करण्यात आली,मात्र दाभोळकरांचा खून ज्यांनी करायला सांगितला,त्या सूत्रधार नराधमांच्या पोलीस यंत्रणा मुस्क्या का आवळत नाहीत ❓ असा जाब विचारणारा राष्ट्रसेवादल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शहरातील मुख्य बाजारपेठेतून मॉर्निंग वॉक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ नेऊन समारोप केला.यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. सरकार आणि पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले होते.विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी लढणाऱ्या शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, गोविंद पानसरे,आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश या धडाडीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले मात्र त्यांच्या सूत्रधार यांना सरकार शोधून काढून शिक्षका करत नाहीत❓ असा जाब यावेळी कार्यकर्त्यांनी विचारला.समारोपाच्या ठिकाणी दिनकर दाणे, बाबासाहेब कोकाटे, कॉम्रेड किशोर जाधव, प्रा रामदास चव्हाण, प्रा जनार्धन धनगे, प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे,अर्जुन कोकाटे,प्रा डॉ. अजय विभांडिक, नवनाथ शिंदे आदिंनी विविध प्रश्न उपस्थित करीत सरकारला जाब विचारला. या मॉर्निंग वॉक मध्ये राष्ट्र सेवादल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 75 कार्यकर्ते भर पावसात सहभागी झाले होते.शेवटी नवनाथ शिंदे यांनी या मॉर्निंग वॉक मध्ये सहभागी झालेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद दिला आणि विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपली एकजूट कायम ठेवावी असे आवाहन केले.
